नवी दिल्ली : झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या मोबाईल एप कंपनीच्या डिलीव्हरी बॉयसाठी आनंदाची बातमी आहे. दिवसरात्र ऊन असो वा पाऊस कंपनीसाठी घाम गाळणाऱ्या आणि ट्रॅफीकमधून वाट काढणाऱ्या आपल्या डीलिव्हरी बॉयसाठी कंपनीचे सीईओ दीपींदर गोयल यांनी अनोखे गिफ्ट दिले. थकलेल्या डिलीव्हरी बॉयना चार घटका आराम मिळावा, रिफ्रेश होता यावे, कुटुबियांसोबत चॅटींग करता यावे आणि महत्वाचे म्हणजे जेवण करता यावे यासाठी कंपनीने ‘ रेस्ट पॉईंट ‘ नावाचे विश्रांती गृह उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या आवडत्या हॉटेलमधील खाद्यपदार्थ झटपट घरी पोहचवणाऱ्या झोमॅटो या प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीसाठी काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी आनंदाची बातमी आहे. या उन्हाताणात राबणाऱ्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयना कंपनीच्या सीईओ दीपिंदर गोयल यांनी शेल्टर प्रोजेक्ट अंतर्गत नव्या संकल्पनेचे विश्रांती गृह तयार करण्याची घोषणा केली आहे. डीलिव्हरी बॉयना रिचार्ज होता यावे आणि घडीभर विश्रांती घेता यावी यासाठी ही रेस्ट पॉईंट सगळ्या शहरात उभारण्यात येणार असल्याचे कंपनीचे सीईओ दीपिंदर यांनी म्हटले आहे.
काय असणार आहेत सुविधा ….
या रेस्ट पॉईंटमध्ये जेवण घेता येण्याची सोय, वॉशरूम, मोबाईल फोन रिचार्जची सोय, हायस्पीड इंटरनेटचे कनेक्शन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रथम उपचारांची सोय मिळणार आहे. कंपनीची अशा प्रकारची दोन रेस्ट पॉईंट गुरगाव येथील हेडक्वॉर्टरमध्ये यापू्र्वी प्रायोगिक तत्वावर बांधण्यात आली आहेत.
‘झोमॅटो कंपनीच्या या रेस्ट पॉइंट्सचे केवळ झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर्सनीच नव्हे तर अनेक लास्ट-माईल डिलिव्हरी प्लेयर्सच्या डिलिव्हरी पार्टनर्सनी स्वागत केले आहे. हे पाहून आम्हाला आनंद वाटत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत,’ असे कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी म्हटले आहे. दीपिंदर गोयल पुढे म्हणतात की, झोमॅटोमध्ये 200 हून अधिक लोक काम करीत आहेत, ज्यांनी कंपनीमध्ये सात वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला आहे, ते पुढे म्हणतात यापैकी बरेच कर्मचारी 2011-12 पासून कार्यरत आहेत त्यांनी घेतलेल्या श्रमामुळे कंपनीचे नाव झाले आहे. संस्थेचा त्यांचा अभिमान असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
अशी सूचली कल्पना
आपल्या आवडीचे पाहीजे ते जेवण मागविण्याच्या झोमॅटो ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवर 23 देशांच्या 12 लाख रेस्टॉरंटची यादी उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या अनेक हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करू शकता. या हॉटेल्सची मेन्यू कार्ड्स पाहून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पदार्थ ऑर्डर करू शकता आणि काही मिनिटातच तुमची ऑर्डर थेट तुमच्या पत्त्यावर डिलिव्हर केली जाते. यामुळे आपला बराच वेळ वाचतो. आज या ॲपचे करोडो युजर आहेत. झोमॅटो सुरू करण्याची पहिली कल्पना दीपिंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांना 2008 साली सुचली होती. आयआयटी-दिल्लीचे हे दोन्ही सहकारी जेव्हा बेन कन्सल्टिंग नावाच्या फर्ममध्ये काम करत असताना एकत्र भेटले तेव्हा त्यांना अशी कंपनी काढण्याची कल्पना सुचली होती.