Soft Drinks | सॉफ्ट ड्रिंक म्हटलं की, सर्वात अगोदर दोनचं ब्रँडचं नाव पुढं येतं, एक म्हणजे कोका कोला (Coca cola) आणि दुसरं पेप्सी (Pepsi). पण या बाजारात लवकरच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी कोला बाजारात धुमाकूळ घालणार आहे. या दोन ब्रँड्सला टफ फाईट देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताजा, तजेला देणारा देशी ब्रँड बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे शीत पेय बाजारात किंमती आणि ऑफर्सचं युद्ध भडकल्याशिवाय राहणार नाही. इकॉनॉमिक टाइम्सने याविषयीचे वृत्त दिलं आहे. त्यानुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये सॉफ्ट ड्रिंक ब्रँड कॅम्पा (Campa) पुन्हा बाजारात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला एफएमसीजी व्यवसाय वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून हा ब्रँड विकत घेतला आहे. कोला आणि पेप्सीविरोधात कॅम्पाचा जलवा लवकरच दिसून येईल.
रिलायन्सने दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून (Pure Drinks Group) कॅम्पा (Campa) ब्रँड खरेदी केला आहे. त्यासाठी रिलायन्सने सुमारे 22 कोटी रुपये मोजले आहेत. ईटीने याविषयीचा दाखला एका अहवालाआधारे दिला आहे. ऑक्टोबरपर्यंत कंपनी सॉफ्ट ड्रिंक बाजारात उतरल्यास तिची पेप्सी (Pepsi) आणि कोका (Coca Cola) कोला या कंपन्यांशी थेट स्पर्धा होईल.
कॅम्पा अनेक फ्लेवर्समध्ये बाजारात दाखल होत आहे. त्यामध्ये आयकॉनिक कोला, लेमन आणि ऑरेंज फ्लेवर्सचा समावेश असेल. रिलायन्स रिटेल स्टोअर्स(Reliance Retail), जिओमार्ट आणि रिलायन्सकडून प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये हे उत्पादन खरेदीसाठी उपलब्ध असेल. त्याला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या (RRVL) संचालक ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी रिलायन्स रिटेल यंदा एफएमसीजी व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. उत्पादनांचा विकास आणि वितरणावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड त्यांचा कॅम्पा हा ब्रँड येत्या दिवाळीत बाजारात दाखल करण्याची योजना तयार करत आहे. त्यामुळे दिवाळीत शीतपेयाच्या बाजारात शीत युद्ध नाहीतर जबरदस्त टक्कर पहायला मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या कंपन्यासमोर बाजारात उतरताना रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठ्या ऑफर्स आणि किंमतीचा विचार करावा लागणार आहे.