नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या (Post Office) अनेक योजना आहेत. त्यातील परताव्यामुळे गुंतवणूकदारांना लाखोंचा फायदा होतो. त्यांना या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते आणि कर्ज मिळण्यासही मदत मिळते. यातील अनेक योजनांमध्ये कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक रक्कमी मोठा परतावा मिळतो. पोस्ट खात्यातील अल्प बचत योजनांवर (Small Saving Scheme) वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळण्याचा दावा करण्यात येतो.
पोस्टाच्या अनेक योजनांपैकी मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme) लोकप्रिय आहे. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला चांगला परतावा मिळतो. या योजनेत केवळ 1000 रुपये जमा करुन खाते उघडता येते.
जर तुम्हाला दर महिन्याला कमाई करायची असेल तर या योजनेत एकदाच एकरक्कमी 4.5 लाख रुपये जमा करावे लागतील. त्यामुळे तुम्हाला वार्षिक 29,700 रुपये परतावा मिळेल. महिन्याकाठी तुम्हाला जवळपास 2475 रुपये मिळतील. रक्कम वाढविल्यास दर महा मिळणारा परतावा जास्त असेल.
ही रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळेल. या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळेल. पोस्ट खात्याच्या या योजनेत संयुक्त खाते उघडता येते. त्यामुळे पती-पत्नीला खात्यातंर्गत नियमानुसार फायदा मिळेल.
18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पण तुम्ही 1 वर्षातच रक्कम काढू इच्छित असाल तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. तुम्ही 3 ते 5 वर्षांत रक्कम काढू इच्छित असाल तर एकूण रक्कमेतून 1 टक्के रक्कम कपात करुन परतावा देण्यात येतो.
जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन तु्म्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे.