पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. (Petrol Diesel price) नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाचे दर आज सलग 28 व्या दिवशी स्थिर आहेत. इधनाच्या दरात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. साडेचार महिने स्थिर असलेल्या इंधनाच्या दरवाढीला 22 मार्चपासून सुरुवात झाली, सहा एप्रिलपर्यंत पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक महाग झाले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लावल्याचे पहायला मिळत आहे. आज जाहीर झालेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे 110.85 व 100.94 रुपये आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 105.41 रुपये आहे. औरंगाबादमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 121.13 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 103.79 रुपये मोजावे लागत आहेत. नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.40 आणि 103.73 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेल 103.10 रुपये लिटर आहे. परभणीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेल 106.10 रुपये आहे.
दरम्यान केंद्राच्या वतीने राज्य सरकारला राज्यात पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकार आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. भाजप शासीत सर्वच राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलवर कमी व्हॅट आकारण्यात येत असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इतर राज्यांनी देखील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे केंद्राने म्हटले आहे.