नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price in Pakistan) पाकिस्तानी चलनात 300 रुपये प्रति लिटरच्या पार गेल्या आहेत. गुरुवारी काळजीवाहू केंद्र सरकारने इंधन किंमती वाढीचा नारा दिला. पेट्रोलच्या किंमतीत 14.91 आणि डिझेलच्या किंमतीत 18.44 रुपये प्रति लिटरची वाढ झाली. या वाढीनंतर देशात पेट्रोल 305.26 रुपये तर डिझेल 311.84 रुपये लिटरवर पोहचले. तरीही भारतापेक्षा पाकिस्तानमधील इंधनाच्या किंमती कमी आहेत. भारतात गेल्या वर्षी मे महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलची किंमती 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशात गेल्यावर्षी 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात झाली होती. तेव्हापासून एका वर्षांत इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.
पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण
पाकिस्तानी रुपयाची स्थिती अत्यंत बिकट आहे. भारतीय रुपयापेक्षा पण पाकिस्तानी रुपयाचे अधःपतन झाले आहे. रुपयाच्या किंमतीत काही दिवसात मोठी घसरण झाली आहे. सध्या एका भारतीय रुपयाची किंमत पाकिस्तानच्या 3.70 रुपया बरोबर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीच मान टाकली आहे. मोदी सरकारच्या काळात रुपयात मोठी घसरण झाली. त्यापूर्वी युपीएच्या काळात पण रुपया घसरला होता. अजूनही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सावरलेला नाही. पाकिस्तानी रुपयाची तर भारतीय रुपयापेक्षा पण परिस्थिती बिकट आहे.
असे आहे स्वस्त पेट्रोल
जर पाकिस्तानी आणि भारतच्या चलनाची तुलना केली तर पाकिस्तानमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त असल्याचे दिसते. दिल्लीत भारतीय रुपयात एक लिटरसाठ 96.72 रुपये लागतात. तर पाकिस्तानी रुपयांत एक लिटर पेट्रोलसाठी 358.07 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. तर पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 311.84 रुपये मोजावे लागतात. म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल जवळपास 53 पाकिस्तानी रुपये स्वस्त आहे.
डिझेल किती स्वस्त
तर पाकिस्तानमध्ये सध्या डिझेलची किंमत 305.26 रुपये लिटर आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी 331.78 पाकिस्तानी रुपये लागतील. दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी 89.62 भारतीय रुपये लागतात. चलनाच्या हिशोबाने पाकिस्तानमध्ये डिझेल भारतापेक्षा 20 पाकिस्तानी रुपये स्वस्त आहे.
कच्चे तेल सर्वात महागडे
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली. किंमती सात महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. शुक्रवारी बाजार बंद होताना ब्रेंट कूडची किंमत 1.98 टक्के वा 1.72 डॉलर प्रति बॅरलने वाढल्या. ही किंमत आता 88.55 डॉलरवर पोहचली आहे. तर वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट, डब्ल्यूटीआय क्रूडच्या भावात 2.30 टक्के वा 1.92 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली आहे. हा भाव 85.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. देशात जवळपास दीड वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही.