नवी दिल्ली : जागतिक बाजारात या जानेवारीपासून कच्चा तेलाच्या आघाडीवर दिलासा आहे. भारताच्या रणनीतीमुळे इतर देशांपेक्षा स्वस्तात इंधनाचा पुरवठा सुरु आहे. भारतीय तेल कंपन्यांना सध्या नफ्यात आहे. त्यांचे व्यावसायिक तिमाही निकाल जोरदार आहेत. गेल्यावर्षी केंद्र सरकारने या कंपन्यांना कोट्यवधींचे पॅकेज जाहीर केले होते. नुकसान भरपाई दिली होती. यावेळी नफ्यातूनच त्यांचा तोटा भरुन निघाला आहे. पण गेल्या वर्षाभरापासून सर्वसामान्यांना एक लिटर डिझेलसाठी (Diesel Price) शंभरची नोट खर्ची पडत आहे. तर पेट्रोलसाठी (Petrol Price) काही राज्य वगळता त्यापेक्षा अधिक पैसा द्यावा लागत आहे. पण आता केंद्र सरकारने यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानने रचला इतिहास
दिवाळखोर पाकिस्तानने इंधनाच्या किंमतीतबाबत गेल्या महिन्यात इतिहास रचला. 15 मे ते पुढील पंधरवाड्यासाठी पेट्रोल 12 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमतीत 30 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार (Ishaq Dar) यांनी नवीन किंमतींची घोषणा केली होती. 31 मेपर्यंत हे दर लागू होते.
अशी झाली नुकसान भरपाई
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलचा सर्व मिळून निव्वळ नफा 52 टक्के झाला आहे. कंपनीने मार्च तिमाहीत 10,841 कोटींचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीने 7,089 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने मार्च तिमाहीत 79 टक्के निव्वळ नफा मिळवला. नफ्याचे गणित पुढील तिमाहीसाठी कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.
कच्चे तेलात घसरण
गेल्या वर्षी 2022 च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात युक्रेनवर रशियाने हल्ला चढविला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. त्याचा थेट परिणाम सर्वच देशांवर दिसून आला. श्रीलंकेसह अनेक छोट्या अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. या देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. भारतात तर पेट्रोल 120 लिटरच्या घरात पोहचले होते. डिझेलमध्ये दरवाढीची रेकॉर्डब्रेक उसळी होती.
काय दिले संकेत
मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीविषयी भाष्य केले. पेट्रोल कंपन्या लवकरच भाव कमी करण्याचा विचार करतील, पण त्यासाठी जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर स्थिर असणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणजे हा जर-तरचा खेळ आहे.
टोलवाटोलवी
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी असे दोन वेळा वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला किती गंभीर घ्यावे असा प्रश्न आहे. इंधनाचे भाव स्वस्त करण्याविषयी तेल कंपन्या केंद्राकडे तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तेल कंपन्यांकडे बोट दाखवितात. त्यात त्यांनी सहा महिन्यांचा वेळ मारुन नेला. या टोलवाटोलवीने काही काळापुरती चर्चा होते, पण ठोस काहीच घडत नसल्याचे दिसून आले आहे.
तरी ही शक्यता का
सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.
निवडणुकांचा हंगाम आला
मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक झाल्या. आता 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पहिली कपात होण्याची शक्यता आहे.