मुंबई : भारतात जानेवारी 2022 पासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) मागणीत (Demand) घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेलची विक्री कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ हे आहे. मात्र मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत वाढ झाली आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोल, डिझेलची मागणी 2.1 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु दुसरीकडे एलपीजी गॅसच्या मागणीत घट झाली आहे. कोरोना काळात एलपीजी गॅसची मागणी वाढली होती. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता एलपीजी गॅसच्या विक्रीत मासिक आधारावर 9.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चार नोव्हेंबर 2021 पासून जवळपास साडे चार महिने पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. मात्र त्यानंतर 22 मार्च पासून पुन्हा एकदा इंधन दरवाढीला सुरुवात झाली. पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढले आहेत. याचा फटका पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर झाल्याचे पहायला मिळत आहे.
एप्रिल महिन्यात घरगुती गॅसच्या मागणीत घट झाल्याचे समोर आले आहे. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये गेल्या 22 मार्च रोजी दरवाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले. घरगुती गॅसच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या महागाईचा ताण ग्राहकांच्या खिशावर आल्याने गॅसच्या मागणीत घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला आहे. इंधनाच्या दरात सुरू असलेल्या दरवाढीचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सध्या देशात महागाई सर्वोच्च स्थरावर आहे. खाद्यतेलापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक गोष्टींचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याचा परिणाम म्हणजे दैनंदीन वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. दक्षिण भारतात मागणीत घट होण्याचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडून मध्ये एफएमजी वस्तूंच्या मागणीत मासीक आधारावर 19.10 टक्क्यांची घट झाली आहे. तेलंगनामध्ये 17. 20 तर आंध्र प्रदेशमध्ये हेच प्रमाण 15 टक्के इतके आहे.