नवी दिल्ली : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol and Diesel Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तब्बल एक महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दर वाढ ही सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. सहा एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. चार नोव्हेंबर 2021 रोजी केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर 22 मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र त्यानंतर 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पुन्हा पेट्रोलच्या दरवाढीने उच्चांक गाठला पेट्रोल व डिझेल लिटरमागे तब्बल दहा रुपयांनी महाग झाले. मात्र सहा एप्रिलपासून पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जाहीर झालेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा भाव 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 तर डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार बिगर भाजप शासीत राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर हे अधिक आहेत. तर भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत. राज्यांनी व्हॅट कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होतील आणि जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. व्हॅट नेमका कोणी कमी करवा या मुद्द्यावरून आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव 120.40 रुपये लिटर असून, डिझेलचा भाव 103.73 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.20 तर डिझेलचा दर 103.10 रुपये आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत असून परभणीत पेट्रोलचा दर 123.51 रुपये तर डिझेल 106 रुपये प्रति लीटर आहे.