मुंबई : अॅमेझॉनचे प्रमुख (AMAZON CEO) जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचा फोन हॅक करुन त्यांचे खासगी फोटो लिक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तपास करणाऱ्या पथकाने बेजोस यांच्या फोन हॅकिंगमागे सौदी अरबचे अधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनीच बेजोस यांची खासगी माहिती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तपास अधिकारी गाविन डी. बेकर यांनी सांगितले.
बेकर यांनी या हॅकिंगचा संबंध सौदी अरबचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येशी असल्याचे म्हटले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राचे मालकी अधिकार अॅमेझॉनचे प्रमुख बेजोस यांच्याकडेच आहेत. याच वर्तमानपत्राने पत्रकार खशोगी यांच्या हत्येचा पाठपुरावा केला होता. खशोगी यांची हत्या तुर्कीच्या इस्तांबुलमधील सौदी अरबच्या दूतावासात घडली होती. यावर द वॉशिंग्टन पोस्टने सौदी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते.
बेकर यांनी ‘द डेली बीस्ट’ या वेबसाईटवर लिहिले, ‘‘आमच्या तपास अधिकाऱ्यांनी आणि अनेक तज्ज्ञांनी तपासाअंती निष्कर्ष काढला आहे. यानुसार सौदी अरबनेच बेजोस यांचा फोन हॅक करुन त्यांची खासगी माहिती मिळवली.’’