नवी दिल्ली : आता ग्रामीण भागातही डिजिटल बँकिंगचा (Digital Banking) डंका वाजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरात एकूण 75 डिजिटल बँकिंग सेवा देशाला अर्पण केली. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवांचे उद्धघाटन केले. या सेवेमुळे आता ग्रामीण भागातील ग्राहकांसाठीही (Rural Area Customer) डिजिटल सेवेचे दालन उघडले आहे.
या डिजिटल सेवेच्या शुभारंभामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवांपासून वंचित लोकांना या सेवा प्राप्त करणे सोपे होणार आहे. ग्रामीण क्षेत्रातील गरिब ग्राहकापर्यंत डिजिटल सेवांचा लाभ पुरविण्यासाठी सरकारने हे पाऊल टाकल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नवीन डिजिटल बँकिंग सेवांमध्ये जम्मू-काश्मीरच्या दोन डिजिटल बँकांचा समावेश आहे. यामध्ये एक श्रीनगर येथील लाल चौकातील SSI ही शाखा आहे. तर दुसरी शाखा जम्मू येथील चन्नी राम ही आहे. चांगल्या आणि जलद बँकिंगचा अनुभव देण्यासाठी यामुळे फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिनटेक कंपन्या देशातील बँकिंग क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. तर UPI पेमेंट्समुळे नवीन व्यवहाराचे दार उघडल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सर्वच क्षेत्रात जलद व्यवहाराची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात देशातील 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिटच्या स्थापनेची घोषणा केली. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील 75 जिल्ह्यांत ही सुविधा सुरु करण्यात येत आहे.
या डिजिटल बँकिंगमुळे देशातील प्रत्येक भागात डिजिटल सेवा पोहचविण्यात येणार आहे. यासाठी या प्रकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँक, खासगी क्षेत्रातील 12 बँक आणि एक लघु आर्थिक बँकेचा समावेश आहे.
या डिजिटल बँकिंग युनिटमध्ये ग्राहकांना बचत खाते उघडता येईल. या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. पासबूक प्रिंट करता येईल. पैसा हस्तांतरीत करता येतील. तसेच मुदत ठेव आणि इतर गुंतवणूक करता येईल. क्रेडिट-डेबिट कार्ड आणि कर्ज पुरवठा ही करण्यात येणार आहे.