Power crisis : पारा चढल्याने देशात वीजेच्या मागणीत कमालीची वाढ, 2 लाख मेगावॅट विजेची गरज

| Updated on: Apr 30, 2022 | 11:06 AM

देशात जस जसा सूर्य आग ओकतोय, तस-तशी विजेची मागणी पण वाढत आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरी यासह इतर शहरात पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे. तर अनेक शहरांचे तापमान  42 ते 43 अंशांच्या घरात आहे. उकाड्यापासून सुटकेसाठी एसी, कुलर आणि फॅनचा वापर वाढल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. 

Power crisis : पारा चढल्याने देशात वीजेच्या मागणीत कमालीची वाढ, 2 लाख मेगावॅट विजेची गरज
संग्रहित छायाचित्र
Follow us on

गेल्या आठवड्याभरापासून देशातील अनेक शहरे ऑरेंज झोनमध्ये (Orange Zone) आली आहेत. देशात सूर्य आग (Summer Heat) ओकतोय. हवामान खात्यानुसार येते काही दिवस कडक उन्हाचे असतील. याकाळात  कडक उन्हाचा (High Temperature) सामना नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे जनजीवन लक्षणीय प्रभावित झाले आहे. देशातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी यासह इतर शहरात पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे तर इतर अनेक शहरांत पारा 42 ते 43 अंशांच्या घरात आहे. उकाड्यापासून सुटकेसाठी एसी, कुलर आणि फॅनचा सातत्याने वापर सुरु आहे. त्यामुळे घरातील आणि कार्यालयातील वीजेच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी देशातील वीजेची मागणी  207.11 गीगावॅटवर पोहचली, ही आतापर्यंतची वीजेची सर्वात मोठी मागणी आहे. गुरुवारी देशभरात 204.65 गीगावॅट विजेचा वापर झाला.

रेकॉर्ड ब्रेक वीजेची मागणी

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील वीजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचली आहे. देशातील वीजेची मागणी  207.11 गीगावॅटवर पोहचली, ही आतापर्यंतची वीजेची सर्वात मोठी मागणी आहे.  गेल्या वर्षी 7 जुलै 2021 रोजी विजेची अधिकत्तम मागणी 200.53 गीगावॅट होती. मंगळवारी विजेच्या मागणीने तो रेकॉर्ड तोडा. मंगळवारी 8.22 गिगावॅट विजेचीच पूर्तता करता आली नाही. तर बुधवारी 10.29 गीगावॅट विजेल कमी पडल्याचे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

वीज पुरवठ्यावरून आरोप प्रत्यारोप

देशात गेल्या काही दिवसांपासून कोळसा संकटामुळे विज उत्पादन घटल्याने अनेक राज्यांवर वीज संकट ओढावले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राष्ट्रीय राजधानीत वीज संकट असल्याचे पत्र केंद्राला लिहिले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे देशातील अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळसा संकटाची माहिती दिली आणि सध्या परिस्थिती स्थिर असल्याचे सांगितले आहे. सध्या दैनंदिन वापराच्या 2.5 अब्ज युनिट्सच्या तुलनेत सुमारे 3.5 अब्ज युनिट वीज निर्मिती होत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र तरीही संपूर्ण क्षमतेने वीज पुरवठा का करण्यात येत नाही याचे उत्तर सरकारने दिलेले नाही.