नवी दिल्ली : NDTV चे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी त्यांचे जास्तीतजास्त शेअर अदानी समूहाला (Adani Group) विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडच्या (NDTV) संस्थापकांनी शुक्रवारी, 23 डिसेंबर 2022 रोजी याविषयीची माहिती दिली. अहवालानुसार, या कंपनीतील बहुतांश शेअर (Shares) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या समूहाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राधिका आणि प्रणय रॉय (Radhika-Prannoy Roy) एनडीटीव्हीतील त्यांचा 27.26% हिस्सा अदानी समूहाला विक्री करणार आहेत. त्यामुळे अदानी समूहाकडे एनडीटीव्हीतील 64.71% हून अधिकची मालकी होईल.
एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका आणि प्रणय रॉय यांनी याविषयीचे मत मांडले. भारतात पत्रकारीता जागतिक दर्जाची असल्याने 1988 मध्ये एनडीटीव्हीची स्थापना केली. गेल्या 34 वर्षात एनडीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची स्वप्न साकार झाली. त्यांचे आदर्श आणि आशा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
एएमजी मीडिया नेटवर्क, सध्याच्या घडामोडीनंतर एनडीटीव्हीतील सर्वात मोठा भागधारक ठरला आहे. रॉय कुटुंबियांनी त्यांचे बहुतांश शेअर्सची एएमजी मीडिया नेटवर्कला विक्री करण्याचा फैसला घेतला आहे. अदानी समूहाने दिलेल्या सूचना सकारात्मक आणि खुलेपणाने स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
अदानी समूह या महिन्यात ओपन ऑफर दिल्यानंतर एनडीटीव्हीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर झाला. या करारामुळे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील अदानी समूहाची हिस्सेदारी 37 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अदानी समूहाला एनडीटीव्हीत 26 टक्क्यांची हिस्सेदारी हवी होती. खुल्या ऑफरमध्ये केवळ 53 लाख शेअरचा विचार झाला.
अदानी समूह या नवीन अपडेटमुळे एनडीटीव्हीतील सर्वात मोठा भागधारक झाला आहे. त्यामुळे कंपनीला चेअरमन नियुक्तीचा अधिकार मिळाला आहे. यापूर्वी प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी तात्काळ प्रभावाने संचालक पदाचा राजीनामा दिला होता.