नवी दिल्ली : अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अनुदानित सिलेंडर 5 रुपये 91 पैसे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.
मुंबईत सध्या अनुदानित सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 498.57 रुपये आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 780.50 रुपये आहे. नवे दर लागू झाल्यानंतर अनुदानित सिलेंडर 492.66 रुपयांना मिळेल, तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 660 रुपये असेल.
गेल्या महिन्यात अनुदानित गॅस सिलेंडर 6.52 रुपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालं होतं. सलग दुसऱ्यांदा दिलासा देत पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. पेट्रोल आणि डिझेलने नव्वदी गाठली होती, तर डिझेलही 80 रुपये प्रति लिटरच्या वर गेलं होतं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सतत कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोल 74.47 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 65.76 रुपये प्रति लिटर आहे. या किंमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.
ऑक्टोबरमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाही विक्रमी घसरला होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून रुपयामध्ये सुधारणा झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम केवळ वाहनधारकांवरच नाही, तर महागाईवरही याचा परिणाम झाला होता.