मुंबई : घर (House) खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून मिळणाऱ्या महसुलात (Property revenue) गेल्या जून (June) महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जून हा शेवटचा महिना आहे. जूनमध्ये पहिले दोन महिने एप्रिल आणि मेच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात महसूल वाढला आहे. उच्च मूल्याच्या मालमत्तेची नोंदणी, वाढलेले रेडीरेकनर दर आणि मुद्रांजक शुल्कात अतिरिक्त मेट्रो उपकर या काही कारणांमुळे घर खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून मिळणारा महसूल वाढला आहे. जूनमध्ये तब्बल 3,245 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. या महसुलाची तुलना गेल्या आर्थिक वर्षीच्या पहिल्या तिमाहीसोबत केल्यास चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये महसुलात तब्बल 113 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये 7,856.06 कोटी रुपयांच्या महसुलाचे संकलन झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महसुलात वाढ झाली ही केवळ सरकारच्या दृष्टीनेच आनंदाची बातमी नाही तर यामुळे बजारपेठेचा देखील अंदाज येतो. सध्या बाजारात घर खरेदी विक्रीचे व्यवहार जोरदार सुरू आहेत. यामुळेच महसुलात वाढ झाली आहे. तसेच वाढत असलेला महसूल हा कोरोनाची लाट संपल्याचे देखील संकेत आहेत. कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. रोजगार गमावल्यामुळे हातात पैसा नसल्याने मार्केट ठप्प होते. आर्थिक उलाढाल मंदावली होती. याचा फटका हा बांधकाम व्यवसायिकांना देखील बसला होता. घराच्या किमती कमी होऊन देखील घर खरेदी विक्रेचे व्यवहार म्हणावे असे तेजीत नव्हते. मात्र आता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये घर खरेदी विक्रीच्या व्यवहारांना वेग आला असून, महसुलात 113 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सध्या बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मजुरी खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे आता येत्या काळात घराच्या किमती आणखी वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच घरांच्या किमती वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोना लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू घराच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. घराची मागणी वाढल्याने देखील दर वाढण्याची शक्यता आहे.