रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांचे विचार आणि आदर्श कायम आपल्या सोबत आहेत. त्यांनी वर्ष 2020 मध्ये एका संकेतस्थळाला मुलाखत दिली होती. प्रश्नांच्या ओघात त्यांनी बालपणीचा काळ जागवला. त्यांचे बालपण अत्यंत लाडात आणि चांगले गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. पण मोठे होत असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यामुळे दोन्ही भाऊ भावनिक झाले. त्यांच्या अडचणी वाढल्या. त्यावेळी पती-पत्नीत घटस्फोट ही मोठी घटना असायची. या गोष्टींचा या दोन्ही भावाना मोठा त्रास झाला.
शाळेत त्यांना चिडविण्याचा प्रकार
रतन टाटा यांनी या मुलाखतीत, त्यांना आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले, याची माहिती दिली. दोन्ही भावाना या गोष्टीमुळे त्रास झाला. पुढे त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. ही गोष्ट त्यांच्या शाळेत पसरली. तेव्हा या गोष्टीवरून अनेक विद्यार्थी त्यांना चिडवित असत. या घटनेच्या त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. पण त्यांच्या आजीने या काळात त्यांना धीर दिला. त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. कोणतेही चुकीचं पाऊल न टाकण्याचे सातत्याने बजावले. आजीने आपली खूप काळजी घेतल्याचे ते म्हणाले. जेव्हा त्यांची आजी एकदम आजारी पडली, तेव्हा अमेरिकेत करियर करण्याची इच्छा असतानाही ते सर्व सोडून भारतात परत आले.
वडिलांसोबत या मुद्यावरून मतभेद
रतन टाटा यांनी वडील नवल टाटा यांच्यासोबत कोणत्या मुद्यांवर मतभेद होते, हे मुलाखतीत स्पष्ट सांगितले. नवल टाटा यांना जमशेदजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. त्यांचे अनेक मुद्दांवर मतभेद होते. त्यांच्या वडिलांना वाटायचे रतन यांनी पियानो वाजवणे शिकावे, तर त्यांना अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घ्यावे असे वाटत होते. नवल टाटा यांची इच्छा होती की, रतन टाटा यांनी इंग्लंडमध्ये राहून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करावे. तर त्यांना वास्तुविशारद, आर्किटेक्ट व्हायचे होते. पण पुढे काळाने या दोघांमधील गैरसमज दूर केले. रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात मोठी मजल मारली.
हे पुस्तक होते त्यांच्या आवडीचे
‘द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन’ हे पुस्तक त्यांच्या अत्यंत आवडीचे होते. मी पाचवेळा हे पुस्तक वाचलं. माझे डोळे पाणावले असं त्यांनी सांगितले होते. लहानपणी मुंबईतील कॅपियन आणि कॅथेड्रल या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत पोहचले. शाळेत असताना ते पियानो वाजवायला आणि क्रिकेट खेळायला शिकले. त्यांना यशोगाथा वाचण्याचा पण छंद होता. अशी अनेक पुस्तकं त्यांनी संग्रही ठेवली होती.