देशाचे उद्योगमहर्षी रतन टाटा यांना काळाने आपल्यापासून हिरावले. देशभक्त, उद्योगी, संयमी, प्रामाणिक, हळवे, मृदूभाषी अशी अनेक शब्द अक्षरश: ते जगले. काळाच्या गतीने ते धावले. भारताची मान जागतिक उद्योगात त्यांनी मानाने उंचावली. त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वात प्रेमाची एक किनार पण आहे. त्यांनीच या विषयीचा किस्सा सांगितला आहे. Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनाचा हळवा कोपरा मोकळा केला. त्यांच्या आयुष्यात तरुणी आल्या नाहीत असे नाही. पण या प्रेमाचा शेवट कधी गोड झालाच नाही. त्यांचे लग्नाचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यांनी उद्योगक्षेत्रात स्वत:ला इतके झोकून दिले की त्यांना या गोष्टीची उणीव कधी जाणवली नाही. काय आहे त्यांच्या प्रेमाची गोष्ट?
तसं कोणी भेटलंच नाही…
रतन टाटा यांच्या यशोगाथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात काही तरुणी आल्याचे ऐकले असेल. पण रतन टाटा यांनीच एका मुलाखतीत एका प्रेमाची गोष्ट उलगडून सांगितली. Humans of Bombay यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आयुष्यपटातील हळवा कोपरा उघडला. ‘अशी कोणी पुन्हा भेटलीच नाही, जिला पत्नी म्हणू शकू’ अशा शब्दात त्यांनी भावनांना त्यावेळी वाट मोकळी करून दिली. ज्या तरुणीशी त्यांची ओळख झाली होती. तिच्याशी त्यांना लग्न करायचे होते.
युद्ध हे वाईटच, टाटांच्या प्रेमाचा असा झाला अंत
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी या प्रेम कहाणीची सुरुवात सांगितली. ते अमेरिकेतली एका कंपनीत उमेदवारी करत होते. त्यावेळी लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. पण 1962 मधील भारत-चीन युद्धाने या प्रेमाच्या गोष्टीचा अंत झाला. या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. युद्धामुळे त्यांना काही कारणांनी भारतात परतावे लागले. पण त्यांची मैत्रिण भारतात येऊ शकली नाही. मुलींच्या घराच्यांनी, विशेषतः वडिलांनी या लग्नाला संमती दिली नाही. मग हे प्रेम प्रकरण पुढे सरकले नाही. टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.
दिल के आरमा…
अमेरिकेतील या प्रेमकथेला विराम मिळाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अजून एक तरुणी आली. पण तिला पत्नी म्हणू शकू, अशी साद मन काही देईना, अशी प्रांजळ कबुली रतन टाटा यांनी दिली. पुढे व्यवसायाचा पसारा वाढल्याने ते त्या व्यापात गढून गेले. उद्योगाच्या उलाढालीत, नवनवीन कल्पनांच्या गराड्यात इतके अडकले की त्यांना प्रेम आणि लग्न या विषयाची आसक्ती उरली नाही. लग्न अथवा इतर गोष्टीत कधी मन रुळले नाही. आज इतक्या वर्षानंतर त्याविषयी विचार केला तर एक सेकंद पण आपल्याला दुःख होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
तू नभातले तारे माळलेस ना तेव्हा
रतन टाटा यांच्या आई-वडिलांचा संसार तसा नेटका होता. पण पुढे दोघांत काही तरी बिनसले. दोघांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. ते लॉस एंजेलिस येथे शिक्षणासाठी पोहचले. तो काळ तरुणाईने भारलेला होता. निसर्ग संगतीला होता. उराशी अनंत ध्येय होती आणि एक चेहरा मनात होता, असा तो काळ होता. त्याचवेळी ही नजरेची चुकामूक झाली होती. गोष्ट लग्नापर्यंत येऊन ठेपली होती. पण ते प्रेमप्रकरण तिथेच थांबले.