दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांची जागा कोण घेईल, याचा निर्णय अगदी थोड्या वेळात जाहीर होईल. टाटा ट्रस्टने याविषयीची एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडल्या जाऊ शकतो. रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टने अजून या विषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
पारसी समाजाची इच्छा काय?
पारसी समाजाने टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी यावर शिक्कामोर्तब केले होते. ते नोएल टाटा यांच्या नावावर सहमत होते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन जण मुख्य आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते.
रतन टाटा काय म्हणाले होते
रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि टाटा सन्सची कमान एकाचवेळी सांभाळत होते. ही दोन्ही पदं सांभाळणारे टाटा कुटुंबातील ते अखेरची व्यक्ती होते. 2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सर्वानुमते त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती या दोन्ही पदावर राहु शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. सॉयरस मिस्त्री यांच्यासोबत कायदेशीर लढाई झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात रतन टाटा यांची बाजू मांडण्यात आली. त्यांचे वाक्य फार महत्त्वाचे मानण्यात येतात. अनेक जण त्याचे उदाहरण देतात. ‘मी या ट्रस्टचा सध्या अध्यक्ष आहे. भविष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती असेल. त्याचे नाव टाटा हेच असावे हे गरजेचे नाही. एका व्यक्तिचे आयुष्य हे मर्यादित असते. तर संघटना नेहमी कार्यरत असते.’ असे म्हणणे रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टात मांडले होते.