भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) रेपो रेटमध्ये मोठी कपात करू शकते. 4 ते 6 डिसेंबर अशी पतधोरण समितीची बैठक होत आहे. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो दरांची घोषणा करतील. पण त्यापूर्वीच यावेळी आता ग्राहकांची प्रतिक्षा संपणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. रेपो दरात मोठ्या कपातीचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही महिन्यात महागाईने डोके वर केले असले तरी आता त्यात दिलासा मिळाल्याने जैसे थे असलेल्या रेपो दरात कपातीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गृहकर्जापासून ते इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
किती होऊ शकते कपात?
जपानची बँक नोमुराने आरबीआय रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक शुक्रवारपासून व्याज दर कपातीचा निर्णय लागू करण्याची शक्यता आहे. रेपो दरात 1 टक्का अथवा 100 बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते, व्याज दरात एक टक्का नाही तर अर्धा टक्का कपातीची शक्यता आहे. नोमुराने आर्थिक वर्ष 2025 साठीच्या भारताच्या जीडीपीचा यापूर्वीचा अंदाज कमी केला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था 6 टक्के विकास दर गाठेल असा अंदाज आहे. यापूर्वी हा अंदाज 6.9 टक्के होता. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरच्या पतधोरण अंदाजात विकास दर 7.2 टक्के असेल असा दावा केला आहे.
विकास दर मंदावला
नोमुराने दिलेल्या अहवालात, भारताचा विकास दर मंदावल्याचे म्हटले आहे. जीडीपी वाढ, क्रेडिट वाढ, घाऊक महागाई यामुळे विकासाचा दर कमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेपो दरात कपातीची आग्रही मागणी करण्यात येत आहे. यावर्षी जुलैपासूनच आरबीआय रेपो दरात कपात करेल असा दावा करण्यात येत होता. पण हा दावा फोल ठरला. आता या 6 डिसेंबरमध्ये वर्षाअखेरीस तरी आरबीआय नवीन वर्षाचे गिफ्ट ग्राहकांना देणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.
कधीपासून रेपो दर कायम
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले आहे. रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. खाद्यान्न महागाईमुळे आरबीआयला प्रत्येकवेळी निर्णय घेताना हात आखडता घ्यावा लागल्याचे दिसत आहे. तरीही यावेळी अनेकांना चमत्कार होण्याची शक्यता वाटत आहे. रेपो दरात मोठी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.