नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : टोमॅटो, तुरदाळसह तांदळाने महागाईचे आकडे फुगवले आहे. त्यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास बँका ईएमआयवरील हप्ता लागलीच वाढवतील. व्याज दरात वाढ झाल्याने ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना महाग मिळेल. त्यासाठी अधिकचा ईएमआय (EMI) द्यावा लागेल. आरबीआयच्या पतधोरण समितीची (RBI MPC Meeting ) बैठक होत आहे. ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात 10 ऑगस्ट 2023 रोजी बैठक होईल. त्यात रेपो दराचा निर्णय होईल. जर या समितीने सध्याचा रेपो रेट कायम ठेवला तरी कर्जदारांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यांच्या ईएमआयमध्ये कपात न झाल्याने दिलासा मिळणार नाही.
नाही मिळणार दिलासा
सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर आहे. हा रेपो दर कमी होण्याची सर्वसामान्यांना आशा होती. पण वाढत्या महागामुळे रेपो दरात कपात दूर ती वाढण्याची भीती आहे. मे महिन्यात महागाई दरात घसरण झाली. हा दर 4.25 टक्क्यांवर आला. त्यामुळे कर्ज स्वस्त होण्याची आशा वाढली होती. पण जून महिन्यातील किरकोळ महागाईच्या आकड्यांनी टेन्शन वाढवले. महागाई दर 50 बेसिस पॉईंटवर उसळला. हा दर 4.81 टक्क्यांवर पोहचला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईशी सामना सुरु असल्याचे अनेकदा म्हटले आहे.
भाजीपाला, धान्याचे दर वाढले
जून महिन्यात महागाईने उंच भरारी घेतली. टोमॅटोच्या किंमतीत 400 टक्क्यांची वाढ आली. अनेक ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांवर पोहचला. खरीप पिकांवर मोठे संकट आले. मुसळधार पावसाने गणित बिघडवले. अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची यांच्यासह इतर भाजीपाला महागला. त्यामुळे किचन बजेट विस्कळीत झाले.
तांदळाच्या किंमती वधारल्या
तांदळाच्या किंमतीत मोठी उसळी आली. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाची निर्यात थांबवली. तुरदाळ आणि इतर दाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ बाजारात तुरदाळ 180 ते 200 रुपये प्रति किलोवर पोहचल्या आहेत. गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
वर्षभरात व्याजदरात मोठी वाढ
व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.
रशिया-युक्रेन युद्धाने गणित बिघडले
गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर चढाई केली. जगभरात महागाई वाढली आहे. कच्चा तेलाचे भाव कमी झाले असले तर इतरी खाद्यान्न, डाळी यांच्या उत्पादनावर आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला. उत्पादन घटले.
रेपो दर म्हणजे काय?
देशातील व्यावसायिक बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक कर्ज पुरवठा करते. त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दरात वाढ झाली की केंद्रीय बँक देशातील बँकांना महाग दराने कर्ज पुरवठा करते. बँका कर्जाचा बोजा ग्राहकांवर टाकते. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात वाढ होते. आरबीआय महागाईत कर्ज कमी होण्यासाठी बाजारात लिक्विडिटी कमी करते. त्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येते.