नवी दिल्ली : देशात डिजिटल बँकिंगची (Digital Banking) सेवा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या चार वर्षात डिजिटल व्यवहार प्रचंड वाढले आहेत. तसा एटीएमचा (ATM) वापर कमी झाला आहे. एटीएममधून रोख रक्कम काढून तीचा व्यवहारात वापर करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पण तरीही एटीएम सेवेविरोधातच ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे समोर आले आहे. डेबिट कार्डसंबंधीच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. तक्रारींचा सूर आवळल्याने आरबीआयने ही त्याकडे लक्ष दिले आहे.
बँका अथवा त्यांच्या उत्पादनाबाबत ग्राहकांच्या तक्रारींसाठी RBI ने सुविधा केली आहे. त्यासाठी बँकिंग लोकपालाची, बँक ओम्बुड्समॅन (Banking Ombudsman) यांची व्यवस्था केली आहे. लोकपालांकडे तक्रारींचा पाऊस पडला. त्याचा आता निपटारा करण्यात येणार आहे.
देशभरातील बँक ओम्बुड्समॅनकडे याविषयीच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यात डेबिट कार्डसंबंधीच्या तक्रारी जास्त होत्या. 1 एप्रिल ते 11 नोव्हेंबर 2021 या दरम्यान बँक ग्राहकांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यात एटीएमसंबंधीच्या तक्रारींचा जास्त भरणा आहे.
आरबीआयने बुधवारी याविषयीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, केंद्रीय बँकेकडे 2021-22 या कालावधीत बँकांच्या विविध सेवांविषयीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण 4,18,184 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तक्रारींमध्ये 9.39 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकिंग लोकपाल कार्यालयाने यातील 3,04,496 तक्रारींचे व्यवस्थापन केले आहे. यामध्ये 14.65 टक्के तक्रारी एटीएमसंबंधीच्या आहेत. तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या 13.64 टक्के तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या सर्व तक्रारींमधील 90 टक्के ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) पोर्टल, ई-मेल आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) यासह डिजिटल माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत.
केंद्रीय बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 66.11 टक्के तक्रारींचा निपटारा दोन्ही पक्षांच्या सहमतीने करण्यात आला. तर बँकिंग ओम्बुड्समॅनने 2020-21 मध्ये 96.59 टक्के तक्रारींचा निपटारा केला होता.