नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी महागाईने होरपळलेल्या नागरिकांना मोठा धक्का दिला. पतधोरण समितीच्या (MPC) अहवालानंतर रेपो दरात (Repo Rate) 35 बेसिस पाईंटची वाढ करण्याची घोषणा गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. दुपारी ही बातमी बाजारात येऊन धडकली. बाजाराने प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवली. बातमी धडकताच भारतीय शेअर बाजाराला हादरा बसला. निर्देशांक 200 हून अधिक अंकांनी घसरला.
आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात संथ झाली. निर्देशांकात मामुली 11 अंकाची घसरण होऊन तो 62,615 अंकावर आणि निफ्टी 4 अंकांनी घसरून 18,638 अंकावर उघडला. पण रेपो दर वाढीची घोषणा होताच काही मिनिटात निर्देशांकात 210.09 अंकांची घसरण झाली.
Sensex सोबतच बाजारातील दुसरे निर्देशांकही घसरले. Nifty 50 मध्ये घसरण दिसून आली. ऑक्टोबर महिन्यानंतर शेअर बाजारात बऱ्यापैकी तेजीचे सत्र सुरु झाले. गेल्या आठवड्यात बाजाराने कमाल केली होती. परंतु या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसले नाही.
मंगळवारी सेन्सेक्स 208 अंकानी घसरुन 62,626 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी 58 अंकांच्या घसरणीसह 18,642 अंकांवर बंद झाला होता. आज रेपो दराच्या बातमीने पुन्हा बाजारात पडझड झाली. त्याचा गुंतवणूकदारांना फटका बसला.
आरबीआयने बुधवारी रेपो दरात 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांहून 6.25 टक्के झाला. त्याचा मोठा फटका देशातील कर्जदारांना बसणार आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जदारांना आता जादा ईएमआय भरावा लागेल.
7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ झाली. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढेल. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो. आरबीआयच्या धोरणामुळे आतापर्यंत व्याजदरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.