नवी दिल्ली : जूनी पाच रुपयांची नोट आठवते का? उगवत्या सूर्याच्या साक्षीने टॅक्टरने नांगरणी करणारा शेतकरी, आपल्या कृषी संस्कृतीचे प्रतिके होता. ही नोट अनेकांनी जीवापाड जपली. पण ही काही दिवसांनी नोट मळकी, खराब, फाटायची. त्यामुळे केंद्रीय बँकेने 5 रुपयांचे नाणे (Five Rupees Coin) चलनात आणले. त्याला ग्रामीण भागात कलदार, ठोकळा अशी नावे होती. कोणाला फेकून हाणला तर हे नाणं दणकावून लागायचे. पण हे नाणं अचानक बाजारातून गायब झालं. त्याऐवजी अगदी साधं नाणं हाती आलं. या खास ठोकळ्याचा गैरवापर, गैरप्रकार वाढला. तस्करांची या नाण्यावर नजर पडली. त्याचा इतर कामासाठी जास्त उपयोग व्हायला लागला. आता तुम्ही म्हणाल गुन्हेगारांना (Criminals) या नाण्यात असं काय गवसलं की ते या नाण्याच्या हात धुवून मागे लागेल? ज्यामुळे हे नाणंच आरबीआयला (RBI) बंद करावं लागलं?
5 रुपयांचं हे नाणं जाड होतं. हे नाणं तयार करण्यासाठी अर्थातच जास्त धातूचा वापर होत होता. दाढीसाठी आपण जे रोज रेझर वापरतो ना, धारदार ब्लेड ज्या धातूपासून तयार होतं, तोच धातू मोठ्या प्रमाणात हा पाच रुपयांचा ठोकळा तयार करण्यासाठी वापरण्यात आला होता. त्यामुळे तस्करांनी त्याचा गैरवापर सुरु केला. त्यामुळे अखेर हे नाणं भारतीय रिझर्व्ह बँकेला बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
जास्त धातूचा वापर केल्याने 5 रुपयांच्या या नाण्याची तस्करी सुरु झाली. हा व्यवसाय भारतातच नाही तर बांगलादेशमध्ये पण जोरात फुलला. बांगलादेशमध्ये ही नाणी वितळून त्याचा वापर दाढीचं ब्लेड तयार करण्यासाठी करण्यात येऊ लागला. म्हणजे पाच रुपये देऊन दाढीचं ब्लेड खरेदी करायचं, तेच नाणं या दाढीच्या ब्लेडसाठी वापरण्यात येऊ लागलं.
तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण 5 रुपयांच्या एका नाण्यातून 6 ब्लेड तयार करण्यात येत होती. एवढं त्याचा मेटलचा थर जाडजूड होता. त्यावेळी एक ब्लेड 2 रुपयांना विक्री होत होतं. म्हणजे हिशेब स्पष्ट होता. आकडेमोड एकदम स्पष्ट होती. 5 रुपयांचे नाणे वितळून त्यातून 12 रुपये कमाई होत होती. हा व्यवसायानं लागलीच जम बसवला. हा व्यवसाय जोमात सुरु झाला. पण बाजारातून 5 रुपयांचे कलदार अचानक गायब होणे सुरु झाल्याने आरबीआयने याविषयीची चौकशी सुरु केली.
जेव्हा बाजारातून पाच रुपयांचा कलदार, ठोकळे गायब झाले. त्याचा तपास करण्यात आला. त्यामागील कारण समजल्यावर आरबीआयला धक्का बसला. भारतीय रिझर्व्ह बँकेने जुना पाच रुपयांचा ठोकळा बंद केला. त्याऐवजी पाच रुपयांचे पतले नाणे बाजारात आणले. एवढेच नाही तर हे नाणं तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेला धातूही बदलला. त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. या व्यवसायावर गब्बर झालेले लोक जमिनीवर आले. त्यांना आरबीआयच्या खेळीने झटका बसला.