नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 20 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणली जाणार आहे. आरबीआयने याबाबतची माहिती दिली. नोटनोटाबंदीनंतर बाजारात येणारी ही सातवी नवी नोट असेल. नोटबंदीनंतर आरबीआयने 10, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. नोव्हेंबर 2016 नंतर महात्मा गांधी सीरिज अंतर्गत नवीन फिचर्ससोबत नवीन रंग आणि पॅटर्नमध्ये या नव्या नोट्या बनवण्यात आल्या. या नवीन नोटा जुन्या नोटांच्या तुलनेत खूप वेगळ्या आहेत.
20 रुपयांच्या नव्या नोटेवर एक ऐतिहासिक फोटो झळकणार आहे. हा फोटो महाराष्ट्रातील अजिंठा लेणीचा असू शकतो. अजिंठा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. 20 रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटेतील मुख्य बदल हा रंग आणि ऐतिहासिक स्मारकाचा आहे.
20 रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटेत फरक काय ?
– 20 रुपयांची नवी नोट ही जुन्या नोटेपेक्षा 20 टक्के छोटी असेल.
– 20 रुपयांची नवी नोट महात्मा गांधी सीरिजची आहे.
– नव्या आणि आधुनिक सुरक्षा फीचरचा या नोटेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
– या नव्या नोटेमध्ये नंबर पॅनलमध्ये इंग्रजीचा ‘एस’ अक्षर असेल.
– नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे हस्ताक्षर असतील.
– 20 रुपयांच्या नव्या नोटेवर ‘20’ अंक, महात्मा गांधीचा फोटो, गॅरंटी, प्रॉमिस क्लॉज, गव्हर्नरचे हस्ताक्षर, अशोक स्तंभ असणार आहेत.
– नोटाबंदीनंतर बाजारात येणारी सातवी नवी नोट असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग लाल असू शकतो. मात्र नव्या नोटेच्या रंगाबाबत आरबीआयने कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2016 पर्यंत 20 रुपयांच्या नोटांची संख्या 492 कोटी इतकी होती. मार्च 2018 पर्यंत ती 1000 कोटी झाली. चलनातील एकूण नोटांच्या 9.8 टक्के नोटा 20 रुपयांच्या आहेत.