नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये गणना होणारे गौतम अदानी (Gautam Adani) , कायम चर्चेत असतात. जगातील गर्भश्रीमंतांच्या यादीत त्यांनी दुसऱ्या पदापर्यंत मजल मारल्यावर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तर हिंडनबर्ग अहवालानंतर त्यांची घसरण ही सर्वांनी पाहिली. या वाईट काळातही त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रिती अदानी आणि कुटुंब भरभक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभं आहे. पण या नात्याची सुरुवात ही नकारानेच झाली होती, हे अनेकांना माहिती नाही. पहिल्याच भेटीत प्रिती अदानी (Priti Adani) यांनी त्यांना रिजेक्ट केलं होतं. पण पुढे प्रेमाची रेल्वे ट्रॅकवर धावली ती कायमचीच
पहिल्याच भेटीत नकार
प्रिती अदानी यांनी पहिल्याच भेटीत गौतम अदानी यांना नकार दिला होता. पण त्यांच्या वडिलांनी त्यांची समजूत काढली. गौतम अदानी यांच्या शिक्षणामुळे त्यांनी अदानी यांना नकार दिला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली. गप्पाटप्पा झाल्या आणि प्रिती अदानी लग्नास तयार झाल्या. 1 मे 1986 रोजी दोघांचे लग्न झाले.
पहिल्या भेटीत काय बोलले अदानी
गौतम अदानी आणि प्रिती यांचं लग्न घरच्यांनी ठरवलं. पण त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. पण भिडस्त स्वभावामुळे पहिल्या भेटीत अदानी यांना फार काही बोलता आलं नाही. या भेटीविषयी अदानी यांनी आठवण सांगितली. अदानी यांचं कमी शिक्षण आणि प्रिती अदानी या डॉक्टर असल्याने ही जोडी मिसमॅच असल्याचे आपल्याला वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
या पुस्तकात लव्ह स्टोरी
आर एन भास्कर यांच्या ‘Gautam Adani: Reimagining Business in India’ या पुस्तकात ही लव्ह स्टोरी खुलवून सांगण्यात आली आहे. शिक्षणामुळे प्रिती यांनी गौतम अदानी यांना पहिल्याच भेटीत नकार दिला. कारण त्या दंत वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेत होत्या. तर गौतम अदानी यांनी पदवीचं पण शिक्षण पूर्ण केलेलं नव्हतं. प्रिती यांचा जन्म मुंबईत झाला होता. शिक्षणाच्या निमित्तानं त्या अहमदाबादमध्ये गेल्या होत्या.
मला त्यांचा अभिमान
नकारातून नंतर हे प्रेम फुलंल. लग्नाच्या वाढदिवशी प्रिती यांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं होते. त्यांनी 36 वर्षांपूर्वी करिअरला रामराम ठोकला. गौतम अदानी यांच्यासोबत नवीन आयुष्याची स्वप्न रंगवली आणि ती प्रत्यक्षात पण उतरली. त्यावेळी नकार दिला असला तरी, आज गौतम अदानी यांच्याबद्दल आदर, सन्मान आणि अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्नीचा आधार
इतके मोठं साम्राज्य उभारताना पत्नीने मोठी साथ दिली. तिचं आधारस्तंभ आहे. ती कुटुंब, दोन मुलं, नाती आणि अदानी समूहातील कर्मचाऱ्यांकडे लक्ष ठेऊन असते. अदानी फाऊंडेशनचं काम ती करते. तिने तिचे करिअर सोडून मला आधार दिला. वेळोवेळी पाठिशी उभी राहिली, फाऊंडेशनची जबाबदारी पण तिने खाद्यांवर घेतल्याचे गौतम अदानी कौतुकाने सांगतात.
तरीही कुटुंबासाठी वेळ काढतोच
गौतम अदानी यांनी सांगितले की, समूहाचा एवढा पसारा, व्याप असला तरी ते कुटुंबासाठी वेळ काढतातच. आठवड्यातील तीन दिवस ते अहमदाबाद बाहेर असतात. चार दिवस ते शहरात असले तरी त्यांना ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो. पण घरी आल्यावर ते कुटुंबासाठी वेळ काढतातच. पत्नीसोबत ते कार्ड गेम खेळतात. त्यात पत्नीच अधिक वेळा जिंकते, असे त्यांनी सांगितले.