नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशने गुरुवारी एलपीजी सिलेंडरच्या नव्या सुधारित दरांची घोषणा केली. यानुसार, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. या अंतर्गत अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 46 पैसे तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होणार असल्याची माहिती आयओसीएलने दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एलपीजीच्या किंमतीत घट झाली आहे, तसेच रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याने एलपीजीच्या किंमती कमी झाल्याचंही कंपनीने सांगितलं. या निर्णयानंतर मुंबईमध्ये विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 630 रुपयांवर येईल, जी आधी 660 रुपये इतकी होती. तर अनुदानित सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 491.20 रुपये इतकी असेल, जी आधी 492.66 रुपये इतकी होती.
मागील तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होत आहे. याआधी 1 डिसेंबरला अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 5 रुपये 91 पैसे तर विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 120 रुपये 50 पैशांची कपात करण्यात आली होती. यानंतर अनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 492.66 रुपये झाली, जी आधी 498.57 रुपये इतकी होती. तर, विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 660 रुपयांवर आली होती, जी आधी 780.50 रुपये इतकी होती.