नवी दिल्ली : तुम्हाला रेफ्रिजरेटर (Refrigerator) हवा असेल तर घाई करा. येत्या उन्हाळ्यात फ्रिजच्या किंमती (Freeze Price) तुमचा घाम काढतील. काही दिवसातच फ्रिजच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रेफ्रिजरेटर्सच्या स्टार रेटिंगसंबंधीच्या नियमात बदल होत असल्याने किंमतीत वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) येते. त्यांनी स्टार रेटिंगचे सुधारित नियम लागू केले आहेत. 1 जानेवारीपासून हे नियम लागू असतील. या बदलांमुळे रेफ्रिजरेटरच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढतील. 10,000 रुपयांचा फ्रीज ग्राहकांना (Consumer) 10,500 रुपयांचा मिळू शकतो.
BEE, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना त्यांच्या ऊर्जेच्या वापरासाठी स्टार रेटिंग देते. त्याआधारे इलेक्ट्रॉनिक वस्तूला किती वीज लागते हे कळते. सर्वात कमी वीज वापर होत असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला 5-स्टार रेटिंग मिळते. आता BEE ने लेबलिंगची ही प्रक्रिया कठोर केली आहे.
फ्रॉस्ट फ्री मॉडेल रेफ्रिजरेटर्ससाठी नियमात आणखी सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. या यामध्ये फ्रीजर आणि रेफ्रिजरेटर प्रोव्हिजनिंग युनिट्ससाठी वेगळे स्टार लेबलिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
नवीन नियमानुसार, ऊर्जा कार्यक्षमतेबरोबरच साठवण क्षमताही वेगळ्या पद्धतीने दाखवावी लागणार आहे. याचा बोजा अर्थातच ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. ग्राहकांना फ्रिजसाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. फ्रिजच्या किंमती महाग होणार आहेत.
बीईई नियमांमुळे आता भारतातील रेफ्रिजरेटरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याच्या किंमतीत वाढ होईल. गोदरेज एंप्लायंस, हायर आणि पॅनॉसॉनिक यासारख्या उत्पादन घेणाऱ्या कंपन्या, येत्या काही दिवसात फ्रिजच्या किंमतीत 2 ते 5 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे.
PTI च्या वृत्तानुसार, गोदरेज एप्लायंसेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, ऊर्जा वापरासंबंधीच्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याने उत्पादन खर्चात वाढ होईल. परिणामी फ्रिजच्या किंमतीत 2 ते 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. प्रत्येक मॉडेल आणि रेटिंगनुसार किंमतीत फरक दिसून येईल.
नव्या रेटिंग प्रणालीनुसार रेफ्रिजरेटर युनिटची सिंगल रेटिंग होते. तर सामान बसण्याच्या जागेसंबंधीही एक रेटिंग असते. नवीन नियमानुसार फ्रीजर आणि इतर जागा, कप्पा स्वतंत्रपणे दाखवावे लागणार आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. त्याचा ग्राहकांवर बोजा पडेल.
हायर अप्लाईंसेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस यांनी भूमिका मांडली. नवीन नियमांमुळे काही उत्पादनातील कंप्रेसर बदलावे लागणार असल्याने किंमतीत वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर पॅनासॉनिकचे फुमियासू फुजिमोरी यांनी नव्या नियमांमुळे रेफ्रिजरेटरच्या किंमतीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली.