नवी दिल्ली : बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांच्या नंतर त्यांच्या पोर्टफोलिओची जबाबदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwla) यांनी संभाळली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओत मोठे बदल दिसून आले.
बिग बुल यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष होते. त्यांनी कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी केले. कोणते शेअर विक्री केले. गुंतवणूक कुठे आणि किती केली, यावर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष होते.
आता त्यांच्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी सहा कंपन्यांचे शेअर खरेदी केले. त्यात पाच कंपन्यांमधील वाटा त्यांनी वाढविला आहे. तर एक नवीन स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओत दाखल झाला आहे. त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात..
टायटन कंपनीत (Titan) रेखा झुनझुनवाला यांनी हिस्सा वाढविला आहे. सप्टेंबर तिमाहीपूर्वी टायटन कंपनीत त्यांचा वाटा 1.07 टक्के होता. तो वाढून आता 1.69 टक्के झाला आहे.
टाईटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग 3.58 टक्के होती. या कुटुंबाकडे टायटनचा 5.1 टक्के वाटा आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत टायटन कंपनीच्या विक्रीत 18 टक्के वृद्धी झाली आहे. ही सकारात्मक बाजू आहे.
बीएसई मधील सिंगर इंडिया कंपनीत रेखा झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे. सिंगर इंडियाचे 42,50,000 शेअर वा 7.91 टक्के वाटा खरेदी केला आहे. काही दिवसांपासून ही कंपनी तेजीत आहे.
सिंगर इंडियाचे बाजारातील एकूण भागभांडवल 374.94 कोटी रुपये आहे. ही कंपनी 1851 साली स्थापन झाली आहे. या कंपनीचे दोन प्रमुख व्यवसाय आहे. त्यातील एक शिवणकामाची उत्पादने आणि दुसरे घरगुती उपकरणे तयार करणे हे आहेत.
रेखा झुनझुनावाला या टाटा कम्युनिकेशनमध्ये 2020 पासून गुंतवणूक करत आहेत. त्यांनी या कंपनीतील वाटा 0.53 टक्क्यांहून 1.61 टक्के इतका वाढविला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 45,75,887 एवढे शेअर झाले आहे.
टाटा मोटर्सला झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2020 मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओत सहभागी करुन घेतले. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना हा वाटा 1.09 टक्क्यांवरुन 1.11 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे.
फोर्टिस कंपनीत झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2017 मध्ये गुंतवणूक केली होती. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी हे सर्व शेअर विक्री केले होते. त्यानंतर पुन्हा शेअर खरेदी केले. 30 सप्टेंबर 2022 रोजी या कुटुंबाकडे या कंपनीचे 92,02,108 शेअर वा 1.22 टक्क्यांचा हिस्सा आहे.
NCC या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांनी 2015 मध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी या कंपनीत 0.16 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. सध्या त्यांच्याकडे या कंपनीची एकूण 12.64 टक्के हिस्सेदारी आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत झुनझुनवाला यांचा पोर्टफोलियो 33,225.77 कोटी रुपयांचा आहे.