नवी दिल्ली : दिल्लीतील खाद्य तेलाच्या बाजाराने (Edible Oil) गेल्या आठवड्याच्या व्यापाराआधारे आनंदवार्ता आणली आहे. देशात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. मोहरी, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किंमतीत (Pam Oil Price) घसरण नोंदविण्यात आली. परंतु, सोयबीन बियाणे, शेंगदाना आणि सरकीच्या तेलाच्या भावात कसलीच घसरण दिसून आली नाही. सोयबीन बियाणे, शेंगदाना आणि सरकी तेलात मागणी वाढली असली तरी बाजारात त्यांची आवक घटली आहे.
बाजारातील सूत्रानुसार, गेल्या हंगामात मोहरीच्या उत्पादनात 25 टक्के वाढ झाली. एप्रिल, मे आणि जून 2022 मध्ये परदेशी तेल महाग झाले होते. पण मोहरीच्या तेलाने जोरदार आघाडी उघडली होती. परदेशी तेलाच्या तुलनेत मोहरीचे तेल जवळपास 20 रुपये किलो स्वस्त होते.
मोहरीने गेल्यावर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने ऐन थंडीत उत्तर भारतातील ग्राहकांना आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. हिवाळ्यात मोहरीचे तेल उष्मांक वाढविण्यासाठी उपयोगी मानण्यात येते. थंडीचा कडाका वाढताच लाडू आणि इतर तळीव पदार्थांसाठी तेलाची मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात परदेशी खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या. त्यामुळे मोहरीच्या तेलाकडे ग्राहकांनी पाठ केली. परिस्थिती अशी झाली की, परदेशातून आयात तेल देशातील तेलापेक्षा स्वस्त झाले. त्यामुळे मोहरीच्या खाद्यतेलाला उठावच नव्हता.
देशातंर्गत उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचीही तशीच परिस्थिती होती. उत्पादन चांगले असूनही परदेशी तेलाने सोयाबीन तेलाचे गणित बिघडवले. स्वस्तात आयात तेलापुढे सोयाबीनचा टिकाव लागला नाही. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या.
आयात होणारे खाद्यतेल कायमस्वरुपी स्वस्त राहिल्यास त्याचा मोहरीवर परिणाम होईल. तेलाच्या किंमती अशाच कमी राहिल्या तर पुढील वर्षी 60-70 लाख टन मोहरीचा साठा तसाच पडून राहू शकतो. पीटीआयने याविषयीचे वृत्त दिले आहे. सोयाबीनच्या तेलाची पण तशीच परिस्थिती राहील.
सरकी तेलाची बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे या तेलाच्या किंमती वधरल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे देशात कपाशीच्या जवळपास 50 टक्के जिनिंग मिल बंद झाल्या आहेत. त्यामुळे या तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची भीती आहे.