रतन टाटा एक उद्योगपतीच नव्हते तर दानशूर व्यक्ती होते. त्यांना भेटल्यानंतर अनेकांचे नशीब चमकून गेले. माणसातील गुण ओळखण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी अनेकांना मोठी मदत केली आहे. बुधवारी रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. Repos Energy च्या संस्थापक अदिती भोसले वाळूंज यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर एक खास किस्सा शेअर केला आहे. रतन टाटा हे त्यांचे मेंटॉर होते, त्यांना भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी रतन टाटा यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना अशी प्रतिक्रिया मिळाली.
रतन टाटा यांना भेटण्याची तीव्र इच्छा
रतन टाटा हे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होते. यामध्ये आरोग्य, मेडिकलपासून ते शिक्षणापर्यंतच्या अनेक क्षेत्रात त्यांची अनेकांना मदत मिळाली. अनेक नवतरुण उद्योजकांचे ते तर प्रेरणास्थानच आहेत. त्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांना आर्थिक मदत केली. अदिती भोसले आणि त्यांचे पती चेतन वाळूंज यांनी Repos Energy हे स्टार्टअप सुरू केले. मागणीनुसार इंधनाचा पुरवठा या थीमवर त्यांची कंपनी काम करते. अदिती यांनी या लिंक्डइनवर एक पोस्ट केली होती. त्यावर या स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण त्यांनी शेअर केली आहे. त्यानुसार, या काळात त्यांनी रतन टाटा यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांना भेटणं काही शक्य होतं नव्हतं. त्यांचं मार्गदर्शन मिळावं, त्यांना भेटावं, अशी अदिती यांची इच्छा होती.
या दोघांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती तयार केली. त्यांनी 3D प्रेझेंटशन तयार केले. त्यात रेपोस एनर्जीचे लक्ष्य, भविष्यातील वाटचाल, आताची प्रगती याविषयीची इत्यंभूत माहिती होती. ऊर्जा क्षेत्रातील काम, तर इंधन क्षेत्रात वितरणातील बदलाची योजना याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. हे प्रेझेंटेशन त्यांनी एका पत्रासह रतन टाटा यांच्याकडे पाठवले. पण अनेक दिवस वाट पाहिल्यावर पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. मग एक दिवस ते रतन टाटा यांच्या बंगल्याबाहेर त्यांची वाट पाहत थांबले. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. 12 तास उलटून सुद्धा त्यांची भेट झाली नाही. ते दोघे तिथून परतले.
घरी आले आणि झाला चमत्कार
आदिती आणि चेतन यांचे हे प्रयत्न वाया गेले नाही. त्यांच्या घरासमोर 12 तास वाट पाहिल्यानंतर थकलेले हे जोडपे घरी आले. तितक्यात फोन वाजला. हॅलो, काय मी अदिती यांच्याशी बोलतोय का? असा आवाज आला. अदिती यांनी त्यांना कोण बोलतंय अशी विचारणा केली. त्यावर मी रतन टाटा बोलतोय, तुमचे पत्र मिळाले. तुम्ही मला भेटू शकता का? अशी विचारणा त्यांनी केली. या एका फोनने त्यांचे आयुष्य पार बदलून गेले. त्यांना आकाश ठेंगणे झाले.
दुसऱ्या दिवशी अदिती आणि चेतन टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्या समोर होते. त्यांच्यात जवळपास 3 तास बैठक झाली. त्यांनी त्यांचे काम आणि उद्देश याची माहिती दिली. त्यांच्या या स्टार्टअपचे त्यांनी कौतुक केलं. 2019 मध्ये पहिल्यांदा आणि 2022 मध्ये दुसऱ्यांदा त्यांना टाटा समूहाकडून गुंतवणूक मिळाली. त्यांच्यासोबतचे ते तीन तास या पती-पत्नीचे नशीब पालटणारे ठरले. रतन टाटा हे अनेक नवउद्योजकांच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याचे अनेक उदाहरणं आहेत.