नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्याच्या आकड्यांनी सरकारच्या स्वस्ताईच्या (Cheapness) दाव्याला एक पटकीत आडवं केले आहे. महागाईचा (Inflation) भस्मासूर दिवसागणिक वाढत आहे. केंद्र सरकार (Central Government) त्यावर उपाय योजना करण्याचा कितीही दावा करत असले तरी सरकारला महागाईच्या आघाडीवर सपशेल अपयश आले हे आकड्यांवरुन दिसून येते.
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना खाद्यपदार्थांवर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. महागाई दर 7.41 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑगस्ट महिन्यानंतर या दरात 0.41 टक्क्यांची वृद्धी झाली. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर 7 टक्के होता.
एप्रिल महिन्यानंतर महागाईमध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून सरकार महागाई आटोक्यात आणण्याच्या पोकळ गप्पा करत तर नाही ना, अशी शंका या महागाई दराच्या वृद्धीमुळे सर्वसामान्यांना येत आहे. खाद्यपदार्थांच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे किरकोळ महागाई दर वाढला आहे.
सप्टेंबर महिना हा सलग 9 महिना आहे, ज्यावेळी महागाईचा वृद्धीदर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई दर 6 टक्के निर्धारीत केला आहे. यापूर्वीच आरबीआयने हा दर आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली होती.
महागाई आटोक्यात येत नसल्याने केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. या वर्षात आरबीआयने सलग रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात अजूनही बँक वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा ईएमआय वाढला असून त्यांच्यावर दरमहिन्याला जादा बोजा पडत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई दर दुप्पट झाला आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई दर 7.41 टक्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा दर 4.35 टक्के होता. तर ऑगस्ट महिन्यात हा दर 7 टक्के होता. खाद्य पदार्थांचा महागाई दर सप्टेंबर महिन्यात 8.60 टक्के होता. गेल्या महिन्यात तो 7.62 टक्के होता.