जगातील सर्वात मोठी आर्थव्यवस्था असलेल्या (US Economy) अमेरिकेचा मार्च तिमाहीचा जीडीपी दर (US GDP growth rate) जाहीर झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये अपेक्षेनुसार सुधारणा झाली नसून, जीडीपीच्या ग्रोथ रेटमध्ये 1.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये अमेरिकेचा आर्थिक विकास दर 6.9 टक्के होता. आर्थिक विकास दर घसरणी मागचे महत्त्वाचे कारण हो देशात वाढत असलेली महागाई आणि व्यापारी तूट (Trade deficit) असल्याचे माणण्यात येत आहे. 2020 नंतर प्रथमच अमेरिकेच्या आर्थिक विकास दरात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत बोलताना अमेरिकन वाणिज्य विभागाकडून सांगण्यात आले की, देशांतर्गत वस्तूंची मागणी उच्च स्थरावर आहे, मात्र वाढत असलेल्या महागाईचा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. येत्या काळात महागाईचा दर कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यावर भर दिला जाईल.
अमेरिकेच्या आर्थिक विकास दरात घट झाली आहे. आर्थिक विकास दर घसरल्याने आता अमेरिकन सरकार देशातील महागाई कट्रोल करण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करू शकते असे माणण्यात येत आहे. पुढील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात 50 बेसिस पॉइंटची वाढ होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेमध्ये सध्या महागाई गेल्या चाळीस वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे व्याज दरात वाढ करून महागाईला लगाम घालण्याचे प्रयत्न होऊ शकतात. अमेरिकेने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील झाल्याचा पहायला मिळतो.
अमेरिकेमध्ये महागाई गेल्या चाळीस वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. महागाईमुळे लिव्हिग ऑफ कॉस्टमध्ये मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचा परिणाम म्हणजे अमेरिकेत पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. या महागाईचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसताना दिसून येत आहे.