मुंबई : जगातील तसेच भारतातील तरुणांचा सर्वात लोकप्रिय दुचाकी ब्रांड रॉयल एनफिल्ड आहे. रॉयल एनफिल्ड-650 ला यावर्षीचा ‘इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला. याआधीही रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटलसाठी या कंपलीला हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारांच्या स्पर्धेत अनेक जबरदस्त बाईक्स होत्या. पण या सर्वांमध्ये रॉयल एनफिल्ड-650 ने बाजी मारत हा पुरस्कार आपल्या नावे केला.
“रॉयल एनफिल्ड-650 ही बाईक त्या 35 लाख ग्राहकांसाठी आहे ज्यांना रॉयल एनफिल्डमध्ये काहीतरी वेगळं हवं होतं”, असे आयशर्स मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी झी बिझनेसला सांगितले.
“आम्ही जास्त बाईक्स लॉन्च करत नाही, कारण आमच्या बाईक्स जास्त वर्ष चालतात, ही इंटरसेप्टर 15 वर्षांसाठी आहे. तर डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत आम्ही BS VI बनवायला सुरुवात करु, त्याची पूर्ण तयारी आम्ही केली आहे. आता केवळ सप्लाय चेन आणि टेस्टिंगवर काम बाकी आहे”, असेही ते म्हणाले.
“मागील 5-6 वर्षात आम्ही प्रोडक्शन क्षमता वाढवली आहे, नव्या बाईक्स बनवायला वेळ लागतो मात्र ज्या आहेत त्या बाईक्स बनवण्याची आमची तयारी आहे. कितीही मागणी आली तरी आम्ही त्यासाठी तयार असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात इंटरसेप्टर आल्यापासून आमच्या नवीन बाईक्सची खूप मागणी आहे.”
“बाईक्सच्या किमतीत 2-4 टक्क्यांनी वाढ केल्याने आमच्या ग्राहकांना काहीही फरक पडत नाही. पण यावर्षी नवीन पार्ट्स लावल्याने तसेच विमा खर्च वाढल्याने बाईक्सच्या किमतींमध्ये 15-16 टक्क्यांची वाढ होणार आहे. पण ही वाढ हळूहळू करण्यात येईल”, असे सिद्धार्थ लाल यांनी सांगितले.