नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला आहे. भारतामध्ये उन्ह्याळ्यात बियरला मोठ्याप्रमाणात मागणी असते. त्यामुळे या काळात बियरच्या विक्रीत वाढ होते. उन्हाळ्यामध्ये बियर कंपन्यांकडून (Beer Company) आपल्या उत्पादनात वाढ केली जाते. मात्र यंदा चित्र थोड प्रतिकुल असल्याचे पहायला मिळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला वाद हे आहे. ज्याप्रमाणे रशिया, युक्रेन वादाचा (Russia-Ukraine Crisis) परिणाम हा पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. त्याचप्रमाणे तो बियरच्या उत्पादनावर देखील झाला आहे. बियर बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून गहू (Wheat)आणि बार्ली यांचा उपयोग केला जातो. रशिया आणि युक्रेन हे दोनही देश जगातील प्रमुख गहू उत्पादक देश आहेत. रशिया हा जगातिल दुसऱ्या क्रमांकाचा गव्हाचा निर्यातदार देश आहे. तर युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. गव्हाच्या जगातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 25 टक्के उत्पादन या दोन देशात होते. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादाचा फटका हा गहू आणि बार्लीच्या निर्यातीवर झाला आहे. कच्चा माल वेळेवर मिळत नसल्याने बियर उद्योगाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात हा वाद सुरूच राहिल्यास याहीपेक्षा बिकट परिस्थिती होऊ शकते अशी शंका बियर कंपन्यांना असल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
याबाबत बोलताना प्रीमियम बियर ब्रँड Bira91 चे सीईओ अंकुर जौन यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला या वादाचा मोठा फटका हा बियर उद्योगाला बसू शकतो. यामुळे बियर कंपन्यांच्या नफ्यात घट होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाचा वेळेत पुरवठा न झाल्यास कच्चा माल अधिक दराने खरेदी करावा लागले. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने बियर उद्योगाला तोटा सहन करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये बियर कंपन्या आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याचा देखील निर्णय घेऊ शकतात.
जगासह भारतात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे मागील दोनही वर्षांत मार्च -एप्रिलमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडता आले नाही, तसेच सर्व दारूची दुकाने देखील बंद होते याचा मोठा फटका हा बियर उद्योगाला बसला. यंदा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने व्यवसायासाठी अशादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र रशिया आणि युक्रेमध्ये वाद सुरू झाल्याने सलग तिसऱ्या वर्षी बियर उद्योग संकटामध्ये सापडला आहे.
मारुती सुझुकीच्या वाहनांची मागणी वाढली; सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास अधिक उत्पादन शक्य
सावधान! स्टार्ट अप कंपन्यांत गुंतवणूक करताय ? मग त्यापूर्वी हे वाचाच