नवी दिल्ली : होळीच्या अगोदरच महागाईनं बेरंग करण्यास सुरुवात केलीये. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine war) कच्च्या तेलाचे (Crude oil) दर 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढत असतानाच खाद्यतेलाच्या (Edible oil) दरवाढीनं सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केलीये. भारतात गेल्या 15 दिवसांत खाद्य तेलाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन, सूर्यफूल आणि भूईमूग तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. मोहरीच्या तेलाचा दर याआधीच 200 रुपये प्रति लिटरवर पोहचलाय. कच्चा तेलाचा पुरवठा मर्यादित असल्यानं खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. यातच आता रशिया आणि युक्रेनेच्या युद्धानं महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय.
भारतात सुमारे 65 टक्के खाद्यतेल आयात होते. आयात होणाऱ्या तेलात 60 टक्के वाटा हा पाम तेलाचा आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून पाम तेलाची सर्वाधिक आयात करण्यात येते. कोरोनामुळे जागतिक साखळी पुरवठा विस्कळीत झाल्यानं पुरवठा मर्यादीतच होत आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये मलेशियात कच्चा पाम तेलाचं उत्पादन जवळपास 14 टक्के आणि साठा 8 टक्क्यानं घटला होता. कच्चा तेलाचा पुरवठा मर्यादित असतानाच रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढलीये. ऑक्टोबर 2021 पर्यंत देशात 19 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली. त्यापैकी 16 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात रशिया आणि युक्रेनमधून करण्यात आली. युद्धामुळे सध्या खाद्य तेलाच्या आयातीत खंड पडण्याचा धोका वाढलाय.
भारतात दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून मोठ्याप्रमाणात आईसक्रीम तयार करण्यात येत असल्यानं महाग तेलामुळे उन्हाळ्यात आईसक्रीम खाणेही महाग होणार आहे. आता तेल महाग झाल्यानं आईसक्रीमचे दरही वाढणार आहेत. तेलाचे दर वाढल्यानं फक्त आईसक्रीमच महाग होणार नाही तर नमकीन खाद्यपदार्थ आणि हॉटेलमध्ये खाणंही महाग होऊ शकतं.
भारत तेलबिया उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्यासच तेलाचे दर कमी होऊ शकतील. सरकारच्या प्रोत्साहनामुळे तेलबियाच्या लागवडीत वाढ झालीये, उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजनुसार यंदा 371 लाख टन तेलबियांचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, विक्रमी उत्पादन होऊनही तेलाच्या आयातीवरची निर्भरता फार मोठ्या प्रमाणात कमी होणार नसल्यानं सामान्य नागरिकांचं महागाईनं कंबरडं मोडणार आहे.
गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन
Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर