नवी दिल्ली : महागाईने (Inflation) सर्वसामान्य माणूस, ग्रामीण भागातील (Rural Area) नागरीकच मेटाकुटीला आले नाहीत तर मोठ-मोठ्या कंपन्यांनाही त्याचा फटका बसला आहे. दैनंदिन वापरातील उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या (FMCG Companies) यामुळे हैराण झाल्या आहेत. त्यांच्यासमोर उत्पादन विक्रीचे मोठे आव्हान समोर ठाकले आहे.
FMCG कंपन्यांच्या उत्पादन विक्रीत सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत कमालीची घसरण नोंदविण्यात आली आहे. जून तिमाही पेक्षा सप्टेंबरच्या तिमाहीत आलेली घसरण मोठी तर आहेच, पण चिंताजनक ही आहे. नील्सन आयक्यू या कंपनीने याविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
कंपन्यांसमोर महागाईने मोठे आव्हान उभं ठाकलं आहे. महागाईमुळे कच्चा माल महाग झाला आहे. खर्चाचे गणित जुळवताना कंपन्यांना किंमत वाढवून भागणार नाही. कारण किंमत वाढवली तर गळेकापू स्पर्धेत मालाला उठाव न मिळण्याची भीती कंपन्यांना सतावत आहे.
या सर्व घडामोडीत सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत कंपन्यांच्या विक्रीत कमालीची घसरण नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत सामानाच्या विक्रीत 0.9 टक्क्यांची घसरण दिसून आली. जूनच्या तिमाहीपेक्षा सध्या निराशाजनक स्थिती आहे.
FMCG क्षेत्रात सलग चौथ्या तिमाहीत मागणी घटल्याने चिंतेचे वातावरण आहे. सर्वात जास्त फटका ग्रामीण भागात बसला आहे. FMCG कंपन्यांच्या मालाला ग्रामीण भागात कसलाही उठाव दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण बाजारातील मागणीत जूनच्या तिमाहीत 2.4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत ही घसरण चिंतेचा विषय ठरली आहे. ग्रामीण भागात महागाईमुळे ग्राहक दुकानातून दैनंदिन सामानाच्या वस्तू खरेदी करत नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
सप्टेंबरच्या तिमाहीत 3.6 टक्क्यांची घसरण दिसून आली. पण कंपन्यांना थोडासा दिलासा शहरी भागात मिळाला आहे. या तिमाहीत शहरी भागात 1.2 टक्क्यांची वृद्धी मिळाली आहे.
ग्रामीण भागात विक्री वाढविण्यासाठी कंपन्यांनी शक्कल लढविली आहे. काही ऑफर्स आणि पॅक, पॅकेटचा आकार लहान करुन तो विक्री करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत ती वस्तू खरेदी करता यावी हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.
यंदा महागाईसोबतच मुसळधार पावसानेही उरली सुरली कसर भरून काढली. त्यामुळे एफएमसीजी उद्योगात चिंतेचे ढग आहे. उत्पादन वृद्धीसाठी अनोख्या कल्पना लढविण्यात येत आहे.