नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : बँकांनी आता गृहकर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. कोट्यवधी ग्राहकांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे आता सोपे झाले आहे. महागाईला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या वर्षापासून सातत्याने रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली. पण त्याचा फटका सर्व प्रकारच्या कर्जदारांना बसला. त्यांचा ईएमआय वाढला. दर महिन्याला एकतर हप्त्यात मोठी वाढ झाली नाही तर काही बँकांनी व्याज परतफेडीचा कालावधी वाढवला. म्हणजे कर्ज फेडण्यासाठी आणखी काही महिने वाढले आहेत. पण आता आरबीआयने नियम बदलला आहे. तुम्ही बँकेकडून गृहकर्ज घेतले असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. या नवीन नियमानुसार तुमचे 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 33 लाख रुपयांची बचत करता येणार आहे. काय आहे हा नियम, कशी होईल तुमची बचत?
स्वस्त हप्ता नुकसानकारक
अनेक बँकांनी त्यांचा EMI वाढवला नाही. तर त्याऐवजी त्यांनी कर्जाचा कालावधी वाढवला आहे. आरबीआयने रेपो रेट वाढवल्याचा भार बँकांनी ग्राहकांच्या डोक्यावर टाकला. आता ग्राहकांचा कर्जाचा कालावधी वाढला. त्यांना अजून काही महिने अधिक कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. म्हणजे कर्जाचा हप्ता तोच राहील, पण निर्धारीत कालावधीपेक्षा अधिक काळ त्याची परतफेड करावी लागेल. म्हमजे 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जाची अजून जास्त कालावधीसाठी परतफेड करावी लागेल. काही जण स्वस्त ईएमआयच्या चक्करमध्ये स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. त्यांना अधिक व्याज द्यावे लागते.
असा होतो फायदा
तुम्ही 40 वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर त्यावर 7 टक्के व्याजदर गृहित धरुयात. अशावेळी 600 रुपये प्रति लाख रुपये ईएमआय येईल. तुम्ही हेच कर्ज 30 वर्षांसाठी घ्याल तर तुम्हाला 665 रुपये प्रति लाख ईएमआय भरावा लागेल. म्हणजे अगदीच मोठी वाढ होणार नाही. पण दहा वर्षे अगोदरच तुमचे कर्ज परतफेड होईल. अतिरिक्त व्याज वाचेल.
नवीन नियम काय सांगतो
हप्त्यांचा बोजा वाढल्याने आरबीआयने नियमात बदल केला. एक नियम 18 ऑगस्ट 2023 रोजी बदलला. या नवीन नियमानुसार, ग्राहकाला 50 लाख रुपयांच्या कर्ज रक्कमेवर व्याजात 33 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल. आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत की, ग्राहकांना न विचारता त्यांनी परस्पर कर्जाचा कालावधी वाढू नये. ग्राहकांना दोन पर्याय द्यावे. एक तर ईएमआय वाढवावा अथवा कर्जाचा कालावधी वाढवावा, असा पर्याय निवडीची संधी द्यावी.
50 लाखांवर 33 लाखांची बचत
ईएमआय न वाढवता, कालावधी वाढवला तर, 50 लाख रुपयांच्या कर्जावर 88.52 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल. पण ईएमआय वाढवला तर 55.7 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल. म्हणजे ग्राहकांचे 33 लाख रुपये वाचतील. यासोबतच चांगल्या म्युच्युअल फंडात 20 वर्षांची बचत केली तर जोरदार कमाई होऊ शकते. त्यामुळे कर्जापोटी गेलेली रक्कम काही प्रमाणात वसूल होऊ शकते.