हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर काँग्रेसने बाजार नियामक सेबीच्या (SEBI) प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. काँग्रेसने एकानंतर एक अशा आरोपांच्या फैरी उडवल्या. त्यामुळे बुच आता चक्रव्यूहामध्ये अडकल्या आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत माधवी पुरी बुच यांच्याविरोधात मोर्चा उघडला. काय केले आहेत काँग्रेसने गंभीर आरोप?
हिंडनबर्गशी काय कनेक्शन?
बुच यांनी कॉन्फ़्लिक्ट ऑफ़ इंटरेस्ट म्हणजे वैयक्तिक फायदा साधल्याचा आरोप केला आहे. पवन खेडा यांच्या आरोपानुसार बुच यांनी सेबी प्रमुख असताना त्या कंपनीतून कमाई केली, जिचे नाव हिंडनबर्ग अहवालात आहे. अगोरा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून (Agora Advisory Pvt Ltd) बुच यांनी 2 कोटी 97 लाख रुपयांची कमाई केली. अगोरा कंपनी ही माधवी पुरी यांचे पती धवल बुच यांची असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध असल्याचे खेडा म्हणाले.
काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती
यापूर्वी पण काँग्रेसने अनेकदा पत्रकार परिषद घेत सेबी प्रमुखांवर तोफगोळा डागला होता. बुच यांना औषधी निर्मिती कंपनी वॉकहार्टशी संबंधित सहाय्य कंपनीच्या किरायातून कमाईचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. बुच यांच्यावर सेबी प्रमुख असताना आयसीआयसीआय या बँकेकडून पगार घेतल्याचा आरोप आहे. सेबी प्रमुख असताना पुरी यांनी ICICI बँकेसह 3 ठिकाणांहून वेतन घेतल्याचा आरोप आहे. याविषयीचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. बुच 5 एप्रिल 2017 ते 4 ऑक्टोबर 2021 पर्योत SEBI च्या सदस्य होत्या., 2 मार्च, 2022 रोजी बुच या सेबीच्या अध्यक्ष झाल्या. त्यावेळी सुद्धा त्या नियमीतपणे आयसीआयसीआय बँकेकडून उत्पन्न घेत होत्या. त्याची किंमत 16.80 कोटी रुपये असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
बुच यांच्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. हिंडनबर्गने गेल्या काही दिवसांपासून बुच यांच्या कार्यशैली आणि कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. बुच यांनी अदानी यांना वाचवण्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसच्या या आरोपींनी बुच यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याविषयी त्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.