नवी दिल्ली : कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) मध्ये अनेकांचा दिवस अविस्मरणीय होतो. अनेकांच्या आठवड्याला अथवा दर दिवसाला येथे मित्रांसोबत वाऱ्या होतात. गप्पांचा फंड रंगतो. या कॉफी हाऊसवर बाजार नियंत्रक सेबीने (SEBI) तडक कारवाई केली आहे. सेबीने कॅफे कॉफी डेला 26 कोटींचा भारीभक्कम दंड ठोठावला आहे. आपल्या उपकंपन्यांचा पैसा या कंपनीने प्रमोटरच्या (Promotors) कंपन्यांसाठी वापरल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. येत्या 45 दिवसांत दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश कॅफे कॉफी डेला देण्यात आले आहेत. हे प्रकरण म्हैसूर एमल्गमेटेड कॉफी अॅस्टेट्स लिमिटिडे (MACEL) या कंपनीला पैसा हस्तांतरीत केल्यानंतर समोर आले. त्यानंतर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. MACEL ही प्रमोटरशी संबंधित कंपनी आहे.
कॉफी डे एंटरप्राईजेस लिमिटेड (CDEL) च्या एकूण 7 सहयोगी कंपन्या आहेत. त्यांचे एकूण 3,535 कोटी रुपये म्हैसूर एमल्गमेटेड कॉफी अॅस्टेट्स लिमिटिडेकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचे सेबीच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे सेबीने कारवाईचा निर्णय घेतला.
या सात कंपन्यांमध्ये कॉफी डे ग्लोबल, टेंग्लिन रिटेल रिअॅलिटी डेव्हलपमेंट्स, टेंग्लिन डेव्हलपमेंट्स, गिरी विद्युत(इंडिया) , कॉफी डे होटल्स अँड रिसॉर्ट्स, कॉफी डे ट्रेडिंग आणि कॉफी डे एकॉन या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतून ही रक्कम हस्तांतरीत करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
म्हैसूर एमल्गमेटेड कॉफी अॅस्टेट्स लिमिटिडेकडे हस्तांतरीत करण्यात आलेले 3,535 कोटी रुपये व्याजासहित वसूल करण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत. तसेच या कंपनीकडील थकीत रक्कम वसूल करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी NSE च्या सल्ल्याने एक स्वतंत्र न्यायीक आयोग गठित करण्यास सांगण्यात आले आहे.
सेबीच्या दाव्यानुसार, म्हैसूर एमल्गमेटेड कॉफी अॅस्टेट्स लिमिटिडेची जवळजवळ सर्व मालकी वीजी सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांकडे आहे. या कंपनीत कुटुंबाची हिस्सेदार 91.75 टक्के आहे. तर वीजीएस कुटुंबीय कॉफी डे एंटरप्राईजेसचे प्रमोटर आहेत.