जगातील दिग्गज उद्योजक रतन टाटा आता आपल्यामध्ये नाहीत. वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई होणार नाही. रतन टाटा यांच्या हातात टाटा समूहाची कमान आल्यानंतर त्यांनी अमुलाग्र बदल केले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्यांनी विचार केला. व्यवसायात अग्रेसर असलेले रतन टाटा हे मोठे दानशूर आहेत. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान केला आहे. त्यांच्या नॅनो कारने कधीकाळी मोठा इतिहास रचला होता. स्वस्त कारचे भारतीयांचे स्वप्न त्यांनी साकारले. जागतिक ऑटो इंडस्ट्रीला त्यांच्या या कल्पनेने मोठा धक्का दिला होता. पण ही कल्पना त्यांना सुचली कशी ते तुम्हाला माहिती आहे का?
पावसात भिजलेले कुटुंब पाहिले नि सुचली स्वस्त कारची कल्पना
जेव्हा रतन टाटा यांनी देशातील सर्वात स्वस्त कार आणण्याची घोषणा केली, त्यावेळी संपूर्ण उद्योग विश्वाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ऑटो इंडस्ट्रीने धसका घेतला. एका मुलाखतीत रतन टाटा यांनी नॅनो कारची कुळकथा सांगितली. ही कार तयार करण्याची कल्पना कशी सुचली, त्यामागे काय कारण होते, याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, भर पावसात एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह स्कूटरवर जाताना त्यांनी पाहिला. कार घेण्याची इच्छा असून पण अनेकांना ऊन, वारा, पावसाचा सामना करावा लागतो हे लक्षात घेत त्यांनी स्वस्त कार आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यानंतर जानेवारी 2008 मधील ऑटो एक्सपोत त्यांनी सर्वसामान्यांची कार सादर केली. अर्थात या कारला बाजारात मोठी कमाल दाखवता आली नाही. ही कार मार्च 2009 मध्ये बाजारात आणण्यात आली. तिची सुरुवातीची किंमत एक लाख रुपये होती. ती नंतर वाढवण्यात आली. टॉप व्हर्जनमध्ये बऱ्यापैकी सुविधा देण्यात आल्या होत्या. टाटांनी स्वस्त कार देण्याचे वचन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले.
पण उत्पादन काही थांबू दिले नाही
एका मुलाखतीत रतन टाटा यांनी टाटा मोटर्सचा तो खतरनाक किस्सा पण सांगितला, ज्यात त्यांना मोठे नुकसान झाले. एका गँगस्टरने टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांना धमकी दिली. रतन टाटा यांनी गँगस्टरला थोपवण्यासाठी स्वतः मोर्चा सांभाळला. त्यानंतर गँगस्टरने टाटा मोटर्सच्या कामात अनेक अडचणी आणल्या. त्याने कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडली. त्यातील जवळपास 2000 कर्मचारी त्याच्या बाजूने झाले. जे कर्मचारी त्याच्या बाजूने नव्हते, त्यांना तो मारहाण, धमकी देत होता. त्यांना काम न करण्यास सांगत होता. ही गोष्ट माहिती होताच रतन टाटा हे स्वतः त्या प्लँटवर पोहचले. ते काही दिवस तिथेच राहिले. त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला. त्यांच्या या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले.