नवी दिल्ली- भारतीय शेअर बाजारात (SHARE MARKET)तेजीचं सत्र कायम राहिलं. सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. आज (मंगळवार) सेन्सेक्स 1344 अंकाच्या तेजीसह (2.54%) बंद झाला. तर निफ्टीमध्ये 417 अंक (2.63%) वाढ दिसून आली. काल (सोमवारी) शेअर बाजारात 180 अंकांची तेजी नोंदविली गेली होती. आज सेन्सेक्सवर टॉप-30 शेअर्स तेजीसह बंद झाले. टाटा स्टील, रिलायन्स आणि आयटीसी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली. आज सर्वाधिक तेजी धातू क्षेत्रात राहिली. धातू क्षेत्र निर्देशांकात 6.85 टक्के वाढ नोंदविली गेली. गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर सर्व निर्देशांक तेजीसह बंद झाले. बहुप्रतिक्षित एलआयसीचा (LIC SHARES) शेअर आज (मंगळवारी) शेअर बाजारात लिस्टेड (सूचीबद्ध झाला. मात्र, सूचीबद्धतेच्या दिवशीच एलआयसी आयपीओ शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदविली गेली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NATIONAL STOCK EXCHENGE) एलआयसीचा शेअर 7.77 टक्के घसरणीसह 875 रुपयांवर बंद झाला. आज एलआयसीचा शेअर 8 टक्के सवलतीसह बाजारात सूचीबद्ध झाला आहे.
कोटक सिक्युरिटीजचे रिसर्च हेड श्रीकांत चव्हाण यांनी बाजाराच्या स्थितीविषयी भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे मार्केट कॅप घसरणीसह गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे. दरम्यान, आज कमी कालावधी शेअर्स खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल पाहायला मिळाला.
गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं होतं. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली.