महागाईमुळे आधिच हॉटेलिंग महागले आहेच. त्यातच सेवा शुल्कच्या(Service Charge) नावाखाली अनेक हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट(Restaurant) सरळसरळ लूट करतात. बरं अन्नपदार्थ, एसी, पाणी याचा चार्ज दिलेला असताना अनेक हॉटेल्स सेवा शुल्क ग्राहकाच्या (Customer) माथी मारुन नफ्यावर नफा कमवितात. थोड्यासाठी कुठे कटकट करायची म्हणून ग्राहकही त्याकडे दुर्लक्ष करतो. अथवा या सेवा शुल्काकडे अनेक ग्राहक लक्ष्यच देत नाही. त्यामुळे हॉटेल्सचे फावते. ही अनुचित प्रथा दिवसागणिक वाढत चालल्याचे लक्षात येताच केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने (Consumer Affairs Ministry) त्याची गंभीर दखल घेतली. ग्राहकांना लुबडण्याची ही प्रथा बंद करण्याचा सज्जड दमच त्यांनी हॉटेल्स आणि रेस्टॉरंन्टला दिला आहे. तसेच सेवा शुल्क अयोग्य व्यापार प्रथा असून ग्राहक त्याविरोधात थेट संपर्क साधून अथवा ईमेलवर तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA),हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आकारण्यासंदर्भात अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स अन्न बिलामध्ये स्वयंचलितपणे किंवा डीफॉल्टनुसार सेवा शुल्क ग्राहकांवर लादू नयेत. एवढेच नव्हे तर कोणत्याही इतर गोंडस नावाचा वापर करुन ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करता येणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही आणि सेवा शुल्क ऐच्छिक आहे. ग्राहकाची इच्छा असल्यास तो सेवा शुल्क देईल अन्यथा देणार नाही. त्याच्या विवेकाला ते पटत असेल तर तो त्याचा निर्णय घेईल. पण त्याला जबरदस्ती करता येणार नाही असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. सोमवारी याविषयीच्या मार्गदर्शक सूचना प्राधिकरणाने देशभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला दिल्या आहेत.
No hotels or restaurants can add service charges automatically or by default in the food bill: Union Consumer Affairs Ministry
— ANI (@ANI) July 4, 2022
सेवा शुल्क वसूल करण्यासाठी हॉटेल्स अथवा रेस्टारंट इतर कोणत्याही युक्त्या लढवू शकत नाही. परंतू काही जण सेवा शुल्क वसूल करण्यासाठी चक्क जीएसटीचा आधार घेत असल्याचे प्राधिकरणाच्या लक्षात आल्याने त्यांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला आहे. सेवा शुल्क हे अन्न बिलासह जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी लागू करून वसूल केले जाणार नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर ग्राहकाला संबंधित हॉटेलने सेवा शुल्क लादल्याचे लक्षात आले तर ग्राहक संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटला बिलाच्या रकमेतून सेवा शुल्क काढून टाकण्यास सांगू शकतो, असे प्राधिकरणाने सांगितले आहे. ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर तक्रार नोंदवू शकतो. 1915 वर कॉल करून किंवा NCH मोबाइल अॅपसह ईमेलद्वारे ही त्याला तक्रार नोंदवता येणार आहे.