नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची (Sovereign Gold Bond Scheme) पहिली मालिका 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. या योजनेला 8 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. हे सुवर्ण रोखे 2,684 रुपये प्रति ग्रॅम या दराने 26 नोव्हेंबर 2015 रोजी बाजारात आले. सध्या IBJA या संकेतस्थळावर सोन्याची किंमत 6,161 रुपये आहे. याच किंमतीच्या जवळपास सुवर्ण रोख्याची किंमत मिळेल. या दराने या मालिकेत गुंतवणूक करणाऱ्यांना 128% पेक्षा अधिकचा परतावा मिळेल. त्यावर व्याज मिळेल, ते बोनसच म्हणावे लागेल. या योजनेतंर्गत स्वस्त सोने तुम्हाला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचे (Stock Exchanges), NSE आणि BSE येथून खरेदी करता येते. डीमॅट खात्यातून या योजनेत गुंतवणूक करता येते.
मिळाला जोरदार प्रतिसाद
RBI नुसार, पहिल्या मालिकेतील सुवर्ण रोखे योजनेत 9,13,571 युनिट (0.91 टन सोने) विक्री झाले. नियमानुसार, सॉवरेन गोल्ड बाँडच्या सुरुवातीच्या 9 मालिकांसाठी योजनेतून बाहेर पडण्यासाठी एक खास किंमत गृहीत धरण्यात येईल. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोन्याचा बाजारातील भावाच्या जवळपास ही किंमत गृहित धरण्यात येईल. या योजनेतील पहिली मालिका 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे रिडम्पश्न प्राईस 20-24 नोव्हेंबर या काळातील बंद भावाची सरासरी गृहित धरण्यात येईल.
सोने मोडणार सर्व रेकॉर्ड
IBJA नुसार, बुधवारी सोन्याच्या किंमतीत 366 रुपयांची वाढ झाली. सध्या 61,616 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. या वर्षी 4 मे रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडायला सोन्याला आता अधिक वेळ लागणार नाही. सोन्याला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 30 रुपयांची आवश्यकता आहे.
1 लाखावर 8 वर्षांत1.28 लाख कमाई
जर एखाद्या गुंतवणूकदाराने नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बाँडमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर 30 नोव्हेंबर रोजी त्याला जवळपास 2.28 लाख रुपये मिळाले असते. म्हणजे गेल्या 8 वर्षांत त्याला जवळपास 1.28 लाख रुपयांचा नफा मिळाला असता. विशेष म्हणजे ग्राहकाला सोने खरेदी करण्याचे वा ते सांभाळण्याची चिंता या योजनेत नाही.
2.75% व्याजाचा मिळेल लाभ
सोन्याचा भाव वाढल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सोन्याचा भाव वाढतच चालला आहे. वार्षिक आधारावर त्याला 2.75 टक्क्यांचे व्याज पण मिळेल. प्रति ग्रॅम ही रक्कम 36.91 प्रति सहा महिने, तर या 8 वर्षात एक युनिट, 1 ग्रॅमवर 590.48 रुपयांचा फायदा होईल. या मालिकेतील गोल्ड बाँडवर सप्टेंबर 2016 नंतर व्याजदर घटले आहे. 2.75 टक्क्याऐवजी 2.5 टक्के व्याज मिळेल.