भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर टाटा समुहातील कामगार आणि रतन टाटा यांचा तरूण जिवलग मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट लिहिली आहे. रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. अलविदा माझ्या लाईटहाऊसला…, अशी पोस्ट शांतनूने लिहिली आहे.
रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री खूपच खास होती. वयात 55 वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनूमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. रतन टाटा यांचा 84 वा वाढदिवस शांतनू नायडूसोबत साजरा केला होता. शांतनूने आणलेला केक रतन टाटा यांनी कापत लाडक्या मित्रासोबत वाढदिवस साजरा केला.
टाटा समुहाची सर्वात स्वस्त कार असलेल्या नॅनो कारने रतन टाटा एकदा ताज हॉटेलला गेले होते. तेव्हा या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली होती. यावेळी रतन टाटा यांची कार शांतनू नायडू चालवत होता. रतन टाटा आणि शांतनू हे दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत असत.
पुण्यातील तेलगू कुटुंबामध्ये 1993 ला शांतनूचा जन्म झाला. त्याला कायम काही वेगळं करण्याची आवड होती. शांतनूच्या मोटोपज या संस्थेने रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी विशेष डेनिम कॉलर बनवली. ज्यावर रिफ्लेक्टर लागला होता. जेव्हा गाडी समोरून येईल. तेव्हा त्या डेनिम कॉलरवर रिफ्लेक्ट होतील आणि त्यातून त्या श्वानांचा प्राण वाचेल, अशी या मागची शांतनूची संकल्पना होती. याच डेनिम रिफ्लेक्टर कॉलरमुळे रतन टाटा आणि शांतनूची भेट झाली. रतन टाटा यांना शांतनूची ही संकल्पना आवडली. इथूनच रतन टाटा आणि शांतनूच्या मैत्रीला सुरुवात झाली. या दोघांमधील नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं. 55 वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनू या दोघांमधील मैत्री कायम वृद्धिंगत होत राहिली.