नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : स्टॉक मार्केटने (Stock Market) सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी बजावली. गेल्या अनेक आठवड्यांपासून या रेकॉर्डची प्रतिक्षा होती. भारतीय शेअर बाजारात Nifty ने पहिल्यांदा 20,000 अंकांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे बाजारासह गुंतवणूकदारांना सत्तर हत्तीचे बळ आले आहे. गेल्या आठवड्यातील तेजीने शेअर बाजाराला उच्चांकावर नेऊन ठेवले. अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांना याचा काय फायदा होणार हा जालीम सवाल विचारण्यात येत आहे. मोठे ब्रोकर्स, गुंतवणूकदार यांना त्यांच्या स्ट्रॅटर्जीचा (Investment Strategy) मोठा फायदा होतो. पण किरकोळ गुंतवणूकदारांनी हुरळून न जाता स्मार्ट गुंतवणूक करणे त्यांच्या फायद्याचे ठरेल. बाजारात प्रत्येक दिवस साजरा करायला मिळत नाही. तेव्हा या रेकॉर्डनंतर काय हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे.
हीच सतर्क राहण्याची वेळ
तज्ज्ञांच्या मते निफ्टी 50 सध्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. आनंदाच्या वातावरणातच बाजारात सतर्क रहावे लागते. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आनंदाने हुरळून जावू नये. गेल्या तीन-चार महिन्यात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये वाढ झाली आहे. तेव्हा अभ्यासाशिवाय कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करु नका. नाहीतर परतावा सोडा, नुकसान पदरात पडेल.
एकदाच रक्कम गुंतवू नका
बाजारातील तज्ज्ञांच्या मते निफ्टीने रेकॉर्ड केला ही आनंदाची बाब आहे. हे चांगले संकेत आहेत. भारताची अर्थव्यवस्था नवीन दमखम दाखवत आहे. पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एकाच स्टॉकमध्ये सर्व पैसा एकादच ओतणे फायदेशीर ठरणार नाही. स्ट्रॅटर्जी, अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ही धावाधाव पण चिंतेचा विषय
एकीकडे निफ्टीच्या रेकॉर्डचा आनंदोत्सव सुरु आहे. तर काही तज्ज्ञांना ही धावाधाव चिंतेचा विषय वाटत आहे. अवघ्या 37 सत्रात म्हणजे 20 जुलै नंतर निफ्टीने हा नवीन रेकॉर्ड गाठला आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना अधिक खिसा खाली करावा लागेल. हे तेजीचे सत्र कायम राहिले तर फायदेशीर, नाहीतर त्यांची गुंतवणूक फायदेशीर ठरणार नाही.
आंधळी कोशिंबीर नको
अनेक तज्ज्ञांनी आता गुंतवणूक करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, डोळे झाकून गुंतवणूक करणे धोक्याचे ठरेल. क्वालिटी स्टॉकवर डाव लावणे फायदेशीर ठरेल. कंपनीचा पोर्टफोलिओ, नवीन ऑर्डर, तिचा नफा, महसुलातील वाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मिडकॅप म्युच्युअल फंडचा पर्याय
काही तज्ज्ञांनी अशा कालावधीत दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यांच्या मते, बाजारात मूल्यांकन जास्त दिसत आहे. पण कंपन्यांचे मार्केट कॅप किती वाढले हे पाहणे आवश्यक आहे. अशावेळी म्युच्युअल फंडात, स्मालकॅप आणि मिडकॅप फंडाचा पर्याय समोर आहे. SIP द्वारे दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. त्यासाठी अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.