नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराचा वारु पुन्हा उधळला गेला आहे. बाजार आज हिरव्या रंगाने न्हाऊन निघाला. दोन्ही इंडेक्स नवीन रेकॉर्ड स्तरावर पोहचले. Sensex ने 1000 अंकाहून अधिकची उसळी घेतली. हा निर्देशांक 70,602.89 अंकावर पोहचला. तर NSE Nifty मध्ये 187.30 अंकांची तेजी आली. निफ्टी 21,210.90 अंकावर पोहचला. यापूर्वी बुधवारी सेन्सेक्स 69,584.60 स्तरावर बंद झाला होता. निफ्टी-50, 255.40 अंकांच्या तेजीसह 21,181.70 वर ट्रेड करत होता.
तेजीनंतर इंडेक्स झाला रॉकेट
बीएसई निर्देशांकाने गुरुवारी सकाळी 9:15 वाजता 656.84 अंकाची उसळी घेतलीम. तो 70,241.44 अंकावर उघडला. तर NSE Nifty मध्ये 187.30 अंकांची तेजी आली. निफ्टी 21,113.60 अंकावर पोहचला. बाजार उघडताच जवळपास 1952 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर 353 शेअर लाल निशाणीवर होते. याशिवाय 70 शेअरमध्ये कुठलाही बदल दिसून आला नाही. अर्ध्या तासाच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला आणि त्याने नवीन ऑल टाईम उच्चांकी स्तर गाठला.
या शेअरमध्ये तेजीचे सत्र
IRFC च्या शेअरमध्ये ताबडतोब कमाई झाली. या शेअरने 12 टक्क्यांची उसळी घेतली. याशिवाय Tech Mahindra, Larsen and Turbo, Infosys, HCL Tech, Bajaj Finance, InfoAge, Adani Green Energy, DLF या शेअर्समध्ये पण मोठी तेजी दिसून आली. तर सरकारी कंपन्यांच्या दबदबा आजही कायम दिसला. या शेअर्सनी मोठी उसळी घेतली. या शेअर्सने छप्परफाड परतावा दिला. ग्राहकांना आज इन्ट्राडेमध्ये कमाई करता आली.
अमेरिकेतील बातमीचा परिणाम
भारतीय शेअर बाजारातील या तेजीमागे अमेरिकेतील बातमीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेड रिझर्व्हने बुधवारी पॉलिसी रेट कायम ठेवण्याचे जाहीर केले. म्हणजे व्याजदरात कुठलाही बदल न करण्याची भूमिका घेतली. सलग तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात यश मिळवले. तर नवीन वर्षात व्याज दरात कपातीचे संकेत दिले आहे. या बातमीचा अनुकूल परिणाम बाजारावर दिसून आला. नवीन वर्षात 2024 मध्ये व्याजदरात 0.75 टक्क्यांच्या कपातीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या हा व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.