नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : शेअर बाजाराचे नियंत्रण करणारी संस्था सेबीने (SEBI) एक मोठं पाऊल उचले आहे. सेबीने बाजारातील नेकेड शॉर्ट सेलिंगला (Naked Short Selling) बंदी घातली आहे. पण सेबीने सर्वसामान्य गुंतवणूकदार सह इतर श्रेणीतील गुंतवणूकदारांना शॉर्ट सेलिंगची परवानगी दिली आहे. पण ते नेकेड शॉर्ट सेलिंग करु शकणार नाहीत. सेबीने हा निर्णय, हिंडनबर्ग आणि अदानी समूहातील वादाच्या एका वर्षानंतर घेतला हे विशेष. आता यामागील समीकरणं काय आहेत. त्याचा परिणाम काय होईल, हे पाहुयात..
नो नेकेड शॉर्ट सेलिंग
सेबीने सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांना फ्यूचर ऑप्शनमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये शॉर्ट सेलिंगला परवानगी दिली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पण याची अनुमती देण्यात आली आहे. शॉर्ट सेलिंग फ्रेमवर्कविषयी सेबीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानुसार, संस्था नेकेड शॉर्ट-सेलिंगला परवानगी देणार नाही. Naked Short Selling मध्ये ट्रेडर त्याच्याकडील अशा शेअरची विक्री करतो, जे त्याने कधी खरेदीच केलेले नसतात. अशा ट्रेडर्सकडे कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसते. पण आता ट्रेडरला असा व्यवहार करता येणार नाही. त्याला नेकेड शॉर्ट सेलिंग करता येणार नाही.
अगोदरच करावा लागेल खुलासा
सेबीने याविषयीचा खुलासा केला आहे. त्यानुसार, फ्युचर-ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल अथवा एखाद्या स्टॉकचे शॉर्ट सेल करत असाल तर अशावेळी गुंतवणूकदारांना खुलासा करावा लागेल. त्याला डिक्लेयरेशन करावे लागेल. हा व्यवहार शॉर्ट-सेल आहे की नाही, याची माहिती ऑर्डर नोंदवताना द्यावी लागेल. यासंबंधीची माहिती दिल्याशिवाय ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही.
काय असते शॉर्ट सेलिंग
शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदारांना त्या स्टॉकची विक्री करण्याची परवानगी देण्यात येते, जो ट्रेडिंगदरम्यान अस्तित्वात नसतो. अशा व्यवहारात शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदार सर्वात अगोदर उधार घेतो आणि नंतर स्टॉकची विक्री करतो. तर नेकेड शॉर्ट सेलिंगमध्ये असे होत नाही. नेकेड शॉर्ट सेलिंगमध्ये ट्रेडर उधारी न करताच ट्रेड करतो. याचा अर्थ ट्रेडर त्याच्याकडील अशा शेअरची विक्री करतो, जे त्याने कधी खरेदीच केलेले नसतात.