मुंबई : कोरोना विषाणूचा कहर जगभरातील शेअर मार्केटमध्ये (Share Market Sensex live update) सुरुच आहे. भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल 2900 अंकांची घसरण होऊन तो 32,778 अंकावर बंद झाला. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Share Market Sensex live update) तब्बल 2500 अंकांनी कोसळला. बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली. त्यामुळे निर्देशांक 33 हजार 200 अंकांपर्यंत कोसळला. बाजारात आज दिवसाची सुरुवात 1700 अंक कोसळून झाली. तर निफ्टीतही 500 अंकांची घसरण पाहायला मिळाली. पुढे यामध्ये आणखी वाढ होत गेली आणि एकावेळी निर्देशांक 2500 अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्याआधी बुधवारी सेन्सेक्स 35,697 आणि निफ्टी 10,458 अंकांवर बंद झाली होती.
त्यानंतर आज बाजाराला सुरुवात होताच, गडगडाट पाहायला मिळाला. मोठमोठे शेअर्स धाडकन आपटल्याने बाजार कोसळला.
भारतीय शेअर मार्केटप्रमाणे अमेरिका मार्केटही 1400 अंकांनी घसरला. यादरम्यान रुपयाही 68 पैशांनी घसरुन त्याचं मूल्य 74.32 रुपये प्रति डॉलर इतकं झालं. 11 ऑक्टोबर 2018 नंतर पहिल्यांदाच रुपया इतका घसरल्याचं पाहायला मिळालं.
YES बँकेचे शेअर 15 टक्क्यांनी घसरले
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या YES बँकेचे शेअर्सचीही पडझड झाली. सुरुवातीला YES बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरुन 24 रुपयांवर पोहोचले. गेल्या 2 दिवसात YES बँकेचे शेअर्स जवळपास 70 टक्क्यांनी घसरले आहेत.