नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सध्या जगभर चर्चा सुरु आहे. अनेक अचाट प्रयोगांमुळे बाजार जगभरात गाजत आहे. परदेशी गुंतवणूकदारांचे तळमळ्यात धोरण असले तरी चीन पेक्षा त्यांनी गेल्या दोन वर्षात भारताकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या वर्षी शेअर बाजारात सौदा पूर्ण झाल्यावर त्याचे अपडेट तीन दिवसांत खात्यात दिसत होते. शेअर विक्रीनंतर पैसा खात्यात यायला तीन दिवस लागत होते. जगभरात जवळपास इतक्याच दिवसांतच सौदे पूर्ण होतात. काही दिवसांनी हा कालावधी कमी केला आहे. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारातील व्यवहार अवघ्या एका दिवसावर (T+1 Settlement) आणण्याची करामत साधली. यावर्षी जानेवारीच्या मध्यात या प्रयोगाची घोषणा झाली होती. शेअर बाजार लवकरच एक क्रांती करण्याच्या तयारीत आहे. आता अवघ्या एका तासातच व्यवहाराचा पैसा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल.
एका तासात सौदे
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाने (SEBI) याविषयीचे संकेत दिले आहेत. सेबी शेअर बाजारातील सौदे अवघ्या एका तासात पूर्ण करण्याची कसरत करत आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. पुढील वर्षात, 2024 च्या अखेरपर्यंत हा पराक्रम भारतीय शेअर बाजार करणार आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात गती येईल. बाजारावर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल. तसेच गुंतवणूकदारांना हक्काच्या पैशांसाठी ताटकाळत बसावे लागणार नाही.
काय दिली माहिती
ग्लोबल फिनटेक फेस्ट कार्यक्रमात माधवी पुरी यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, एकाच दिवसात शेअर बाजारातील सौद्यांचा निपटारा करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. आता भारत त्यापुढचं पाऊल टाकत आहे. अवघ्या एका तासाच गुंतवणूकदारांच्या खात्यात व्यवहाराचा पैसा जमा झालेला असेल. असं करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. पुढील वर्षांच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती पुरी यांनी दिली.
एक दिवसात सौद्याची अशी झाली प्रक्रिया
भारताने शेअर बाजारात एका दिवसात सौदे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार प्रत्येक टप्प्यात त्या गोष्टींची पूर्तता केली. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केली. 20 जानेवारी 2023 रोजी याविषयीची घोषणा झाली. सर्वात अगोदर लहान कंपन्यांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर जानेवारीच्या अखेरीस बाजारातील जायंट कंपन्यांपासून सर्वच कंपन्यांचे सौदे एकाच दिवसात पूर्ण होऊ लागले. टी+1 मुळे गुंतवणूकदारांना झटपट पैसा मिळण्याची सुविधा मिळाली.
गडबडीवर लक्ष
सध्या सेबी म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.