Share Market | गेल्या व्यापारी सत्रात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे (Investors) मोठे नुकसान झाले होते. आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात (Share Market) आपटी बॉम्ब पडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) उरलेली कसरही भरुन काढली. गुंतवणूकदारांचे दिवाळे निघाले.
आजच्या व्यापारी सत्रात सकाळपासूनच पडझड सुरु होती. सर्व निर्देशांक धोक्याच्या पातळीवर व्यवहार करत होते. बाजारात शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपये डुबले.
सकाळी 11:17 वाजता 30 शेअरांवर आधारीत निर्देशांक 604.68 अंकांनी (1.01 टक्के) पडून 59,329.33 अंकावर थांबला. तर, NSE Nifty 180.95 अंकांनी (1.01 टक्के) घसरुन 17,696.45 अंकावर व्यापार करत होता.
जगातील सर्वच शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरु केली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. बाजाराची धूळधाण उडाली.
जागतिक स्तरावर मंदी येण्याची गुंतवणूकदारांची धारणा अद्यापही कायम आहे. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 1,270.68 कोटी रुपयांचे शेअरची विक्री केली.
निफ्टीच्या इंडसइंड बँक, सिप्ला आणि सन फार्मा या कंपन्याच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. आज दिवसभर बाजारात चढउतार होत असताना या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मदतीचा हात दिला.
UPL, Tata Consumer, Hero MotoCorp, M&M, UltraTech Cement या शेअर्सनी बाजारात सर्वाधिक पडझड केली. गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शेवटच्या दिवशी त्यांना तडाखा बसला.
ऑटो, आटी, सार्वजनिक बँका, मेटल, बांधकाम क्षेत्रात 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. तर FMCG क्षेत्रात 1 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.