मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केटमधील (Share Market) गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता सेन्सेक्स (Sensex) 812 अंकांची पडझड झाली. त्यामुळे सेन्सेक्स 54,507 इतका खाली घसरलाय. तर निफ्टीमध्ये (Nifty) 231 अंकांची घट झाली. परिणामी सेन्सेक्स सोबतच निफ्टीही 16 हजार 246 इतका खाली घसरलाय. या घसरणीचा मोठा फटका शेअर बाजारातील गुंतणूकदारांना बसलाय. या पडझडीमुळे अवघ्या काही मिनिटांत लाखो कोटी रुपये बुडालेत. तब्बल अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं नुकसान या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं झालंय. शेअर बाजारावर वेगवेगळ्या घडामोडींचे परिणाम दिसून आलेत. याचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शुक्रवारी सकाळपासूनच शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु होतं, मात्र दुपारी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला..
शेअर बाजारात झालेल्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 2.51 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. अवघ्या पाच मिनिटांच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. बीएससी लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप हे 253 लाख कोटी रुपये इतकं खाली घसरलंय.
जागतिक मंदीचा परिणाम शेअर बाजारातील आकड्यांवर होताना बघायला मिळतोय. वाढती महागाई संपूर्ण जगासमोरचं एक संकट बनलीय. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतोय. पुरवठा आणि मागणी यांच्यातील चढउतारांमुळे बाजारात असमतोल पाहायला मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणंय. तसंच युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम अजूनही बाजारावर जाणवत आहेत. गेल्या 40 वर्षांच्या तुलनेत सगळंच महागलंय.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मूल्य सर्वात कमी असल्यीच नोंद करण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेत 77.82 इतक्या निच्चांकी स्तरावर रुपया पोहोचला आहे. त्यामुळे महागाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यताय.
तेलाच्या किंमतीही बाजारावर मोठा परिणाम करतात. कच्च्या तेलाच्या किंमती हा भारतासाठी मोठा गंभीर विषय आहे. कच्च्या तेलाची किंमत शुक्रवारी कमी झाली असली, तरीही ही गेल्या तीन महिन्यांतल्या उच्चांकी स्थितीत असल्याचंच चित्र आहे. तेल हे सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम करत असल्यामुळे तेलाचा थेट परिणात बाजारावर दिसून येतोय.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार कमालीचा धास्तावलेत. सेन्सेक्समधील पडझडींचा परिणाम पाहता, गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी पैसे काढण्याला प्राधान्य दिलंय. त्याचा फटका भारतीय बाजाराला बसतोय. गेल्या पाच महिन्यात तब्बल 1.62 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले आहे. जूनमध्येही हेच सत्र सुरु आहे. याचा परिणाम बाजारात दिसून येतोय.
शेअर बाजारात फक्त भारतातच पडझड आहे, अशातला भाग नाही. अमेरिकेतही शेअर बाजारातील पडझड सुरु असून त्याचाही परिणाम बाजारावर होतोय. मोठ्या पडझडीनंतरही धास्तावून न जाता गुंतवणूकदारांनी सकारात्मक राहावं, असंही जाणकार सांगत आहेत. तातडीनं पैसे न काढून घेता, काही काळ जाऊ द्यावा, असंही सांगितलं जातंय.